माझी कारकीर्दच टीकेवर आधारित आहे : जॉन अब्राहम

अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहमच्या मते, दोन दशकांहून अधिक काळाच्या आपल्या कारकिर्दीत त्याला अनेकदा चित्रपटसृष्टीत डावलले गेले, मात्र प्रेक्षकांनी त्याला पुढे जाण्याचे बळ दिले. याबद्दल तो प्रचंड कृतज्ञ आहे आणि म्हणूनच तो चांगल्या कथा प्रेक्षकांसमोर आणून त्यांची परतफेड करू इच्छितो. जॉनचे विविध शैलीतील चित्रपट हिट ठरले आहेत. धूम, रेस २, सत्यमेव जयते, ढिशूम आणि पठाण यांसारखे अ‍ॅक्शनपट असोत; गरम मसाला, दोस्ताना, हाऊसफुल २ यांसारखे विनोदी चित्रपट असोत, किंवा वॉटर, नो स्मोकिंग, न्यूयॉर्क, मद्रास कॅफे, परमाणू आणि वेदा यांसारखे नाट्यमय चित्रपट असोत, त्याने सर्वच प्रकारांत स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचा चित्रपट द डिप्लोमॅट हा सत्य घटनांवर आधारित असून प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल, अशी आशा जॉन व्यक्त करतो.

Story: हर्षदा वेदपाठक |
20th March, 09:18 pm
माझी कारकीर्दच टीकेवर आधारित आहे : जॉन अब्राहम

टीका आणि संघर्षाच्या जाळ्यातून पुढे जाणारा अभिनेता

परमाणू माझी पहिली आवृत्ती असल्याचे पूर्वी बोलले जात होते, कारण मी चार वर्षांसाठी गायब झालो होतो. हे एक प्रकारे माझ्यावर दररोज लिहिले जाणारे मृत्युलेख आहेत, आणि ते मला मान्यही आहे. माझी संपूर्ण कारकीर्दच टीकेवर आधारित आहे आणि त्याची मला मजाही वाटते, असे जॉन एका मुलाखतीत म्हणाला.

या सर्व प्रवासात मला पुढे जाण्याचे बळ केवळ माझ्या प्रेक्षकांमुळे मिळाले. या उद्योगातील लोक, निर्माते आणि समीक्षक हे आकड्यांच्या आधारे तुमच्याबद्दल मत बनवतात. मी ते समजतो आणि त्याचा आदरही करतो. पण ज्यांनी मला खऱ्या अर्थाने पुढे जाण्यास बळ दिले, ते म्हणजे माझे प्रेक्षक. म्हणूनच मी द डिप्लोमॅट प्रेक्षकांसाठी बनवला आहे.


चित्रपटसृष्टीतील बदल आणि चांगल्या कथा देण्याची गरज

तिकीटबारीचा विचार करता, गेल्या काही वर्षांत बॉलीवूडसाठी कठीण काळ राहिला आहे. जॉनच्या मते, आता वेळ आली आहे की, प्रेक्षकांना भावणाऱ्या कथा तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावे.

एक निर्माता आणि अभिनेता म्हणून चांगल्या कथा सांगणे आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे. मला मोठे बॉक्स ऑफिस आकडे हवे आहेत का? अर्थातच हो! १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी, ४०० कोटी हे आकडे महत्त्वाचे आहेत, पण ते चांगल्या कथांसह मिळाले पाहिजेत. हाच फरक आहे.

सध्या आपण तिकीटबारीवर जास्त भर देतो, पण आपण का चित्रपट बनवतो, हा मूलभूत प्रश्न विसरत चाललो आहोत. आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यावर परत जावे लागेल आणि लेखनाकडे पुन्हा लक्ष द्यावे लागेल. जॉन कबूल करतो की, पूर्वी तोही फक्त बॉक्स ऑफिस आकड्यांवर भर देत असे. मात्र, आता त्याला चांगल्या कथांचे महत्त्व अधिक जाणवले आहे.


‘द डिप्लोमॅट’ : सत्य घटनांवर आधारित एक जबरदस्त कथा

जॉनच्या द डिप्लोमॅट या चित्रपटाचे दिग्दर्शन नाम शबाना आणि स्पेशल ऑप्स फेम शिवम नायर यांनी केले आहे. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होणे महत्त्वाचे आहे, कारण त्यातून अशा प्रकारच्या अधिक कथा प्रेक्षकांसमोर आणता येतील.

या चित्रपटात जॉन अब्राहम जेपी सिंग या राजदूताच्या भूमिकेत आहे, जे एका भारतीय महिलेची पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी पुढे येतात. जॉन म्हणतो, द डिप्लोमॅटचे पटकथेचे पहिले वाचन होताच तो या कथेत गुंतला.

मला भूराजकीय विषय खूप आवडतात, त्यामुळे ही कथा वाचताच मी तिच्या प्रेमात पडलो. पटकथेचे श्रेय रितेश शाह यांना जाते. माझ्यासाठी कथा हाच सर्वात महत्त्वाचा घटक असतो. प्रेक्षकांसमोर काय सादर करायचे, हे ठरवताना फक्त नावे महत्त्वाची नसतात, तर संपूर्ण चित्रपटाचा अनुभव महत्त्वाचा असतो, असे तो सांगतो.

महिला सुरक्षेवर जॉनचा ठाम विचार

या चित्रपटात महिलांना येणाऱ्या आव्हानांचा मुद्दाही प्रभावीपणे मांडला आहे. यावर बोलताना जॉन म्हणतो, भारतात महिला, लहान मुले आणि प्राणी सुरक्षित नाहीत. मी हे अनेकदा म्हटले आहे आणि जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत मी बोलत राहीन.

लहान मुले आणि प्राण्यांसाठी पुरेसे कायदे नाहीत आणि महिलांबाबतीत कठोर नियमांची गरज आहे. मी कायद्याचा तज्ज्ञ नाही, त्यामुळे यामध्ये फारसा हस्तक्षेप करणार नाही. पण जर तुम्ही मध्यपूर्व किंवा दुबईसारख्या ठिकाणी पाहिले, तर तिथे महिला सुरक्षित आहेत. त्यामागे काही कारण असणारच. आपल्याकडेही सुरक्षितता यावी, यासाठी शिक्षण आणि जागरूकता वाढवण्याची गरज आहे. आपण एक विकसनशील समाज आहोत आणि योग्य दिशेने जात आहोत, पण या प्रक्रियेत अनेक अडथळे येणार आहेत.

भूमिकेसाठी खास तयारी

जेपी सिंग यांच्या भूमिकेसाठी स्वतःला तयार करताना जॉनने मोठी मेहनत घेतली. अॅनिमल चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनय प्रशिक्षक सौरभ सचदेवा यांच्याकडून त्याने प्रशिक्षण घेतले.

शिवमने मला प्रचंड तयारी करायला लावली. संपूर्ण टीमने एकत्र येऊन पटकथेचे वाचन केले. त्यानंतर मी सौरभ सचदेवा यांना भेटलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन आठवडे प्रशिक्षण घेतले. याशिवाय, मी प्रत्यक्ष जेपी सिंग यांना भेटलो, जेणेकरून त्यांच्या हालचाली, देहबोली आणि वागण्याची लकब आत्मसात करता येईल, असे जॉन सांगतो.