मांद्रेनंतर मुख्यमंत्र्यांचा प्रियोळ मतदारसंघावरही दावा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याचे जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रियोळमध्येही भाजपचाच उमेदवार असेल, अशी घोषणा शनिवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केली. प्रियोळमध्ये भाजपचा उमेदवार देण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ज्यांना हे मान्य नाही त्यांनी आताच बाहेर निघावे, असेही त्यांनी स्पष्ट केल्याने भाजप-मगोच्या युतीतील कुरबुरी वाढल्याचे उघड झाले आहे.
मांद्रेचे मगो आमदार जीत आरोलकर यांची गेल्या काही महिन्यांपासून भाजपशी जवळीक वाढल्यानंतर आरोलकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर मांद्रेतील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रेत भाजपचा उमेदवार असेल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी प्रियोळ मतदारसंघात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी प्रियोळ मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार असेल. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी आताच बाहेर निघावे, असे वक्तव्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीला जास्त कालावधी उरलेला नाही. जिल्हा पंचायत, पालिकांच्या निवडणुकांनंतर विधानसभेचे पडघम वाजू लागतील. त्यामुळे अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. परंतु, प्रियोळ मतदारसंघ भाजपकडेच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या वक्तव्यामुळे भाजप-मगो युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या मांद्रेत मगोचा आमदार आहे. जीत आरोलकर भाजपमध्ये गेले तरीही मांद्रेत मगो उमेदवार देईल, अशी घोषणा मगोच्या मांद्रे आणि पेडणेतील समित्यांनी केली आहे. दुसरीकडे यावेळी विधानसभा निवडणूक प्रियोळमधून लढवण्याचे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ठरवले आहे. अशा स्थितीत या दोन्ही जागांवर भाजपने आताच दावा केल्याने भाजप-मगो युती निवडणुकीपर्यंत टिकणार की तुटणार, असा प्रश्न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
दहा हत्तींचे बळ आले : गावडे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यामुळे मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना दहा हत्तींचे बळ आले आहे. पुढील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला इतर पक्षांशी युती करण्याची अजिबात गरज नसल्याचे मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले.
मोदी, शहा, फडणवीसांवर विश्वास ठेवेन : सुदिन
भाजप कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रियोळमध्ये जे बोलले ते योग्यच आहे. पण, सध्याच्या स्थितीत हिंदूंनी एकत्र राहून काम करणे गरजेचे आहे. भाजप-मगो युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला जे सांगतील, त्यावर आपण विश्वास ठेवेन, असे मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर म्हणाले.