दहावीचा निकाल एप्रिलच्या मध्यावर

पेपर तपासणीसाठी अतिरिक्त शिक्षकांची नेमणूक


01st April, 11:24 pm
दहावीचा निकाल एप्रिलच्या मध्यावर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बारावीनंतर दहावीचा निकाल यंदा लवकर म्हणजे एप्रिलच्या मध्यावर जाहीर होणार आहे. १५ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
दरवर्षी दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर होत असतो. प्रथम बारावीचा आणि नंतर दहावीचा निकाल जाहीर होत असतो. यंदा बारावीची परीक्षा आधी झाल्याने २७ मार्च रोजीच निकाल जाहीरही करण्यात आला. यापूर्वी कधीच मार्चमध्ये बारावीचा निकाल जाहीर झाला नव्हता. त्याचप्रमाणे यंदा दहावीचा निकाल एप्रिलमध्ये जाहीर केला जाणार आहे. पेपर तपासणीसाठी अधिक शिक्षकांची नेमणूक करून योग्यप्रकारे नियोजन केले आहे. त्यामुळे बारावीचो निकाल लवकर जाहीर करणे शक्य झाले. दहावीचा निकाल शक्य तितक्या लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. निकाल लवकर जाहीर झाला तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची निवड करण्यासह प्रवेश घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असे शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये म्हणाले.
यंदा दहावीची परीक्षा १ मार्च ते २१ मार्चपर्यंत ३२ परीक्षा केंद्रांतून झाली होती. १८,८७१ विद्यार्थी प्रथमच परीक्षेसाठी बसले होते. त्यात ९,२९७ मुले, तर ९,५७४ मुली होत्या. बारावीची परीक्षा संपल्यानंतर जवळजवळ महिन्यानंतर शालान्त मंडळाने निकाल जाहीर केला. एनईपीमुळे यंदा जूनमध्ये अकरावीचे वर्ग सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. निकाल एप्रिलमध्ये लागला तर मेमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल.

हेही वाचा