दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांचा आदेश : गाडी न हटवल्यास होणार जप्त
मडगाव : रस्त्याशेजारी उभ्या बेवारस वाहनांच्या समस्येमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत वास्को व मडगाव शहरातील वाहतूक पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार मडगावातील ५५ व वास्कोतील ६० बेवारस गाड्या हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सहा महिन्यात मालकाने वाहन न हटवल्यास ते जप्त करण्यात येणार आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांच्याकडून बेवारस वाहनांच्या समस्येचा आढावा घेण्यात आला होता. रस्त्याशेजारी प्रदीर्घ कालावधीसाठी गाड्या उभ्या करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय मान्सूनच्या पार्श्वभूमीवर साथरोगाची संभावनाही वाढली आहे. या कारणास्तव बेवारस गाड्या हटवण्यासाठी कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मडगाव वाहतूक पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांना मार्च महिन्यात सादर करण्यात आलेल्या अहवालात हाऊसिंग सोसायटी, हॉटेल्स व रेस्टॉरंट, इस्पितळ, बँकांनजीक बेवारस व भंगारातील वाहने उभी करण्यात आलेली आहेत. तर वास्कोचे वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या अहवालात दुचाकी, कार अशी सुमारे ६० वाहने बेवारस स्थितीत असल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे.
दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांनी वाहतुकीला अडथळा करणार्या व अपघातास कारणीभूत ठरणार्या या गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले. या वाहनांत पाणी साठवणूक झाल्यास डास उत्पत्ती वाढून साथीचे रोग पसरण्याचीही शक्यता असल्याने या गाड्या हटवण्याची गरज आहे.
सहा महिन्यांचा कालावधी-
जिल्हाधिकार्यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत सदर वाहन चालकांकडून गाड्या हटवल्या नाहीत तर त्या गाड्या सरकारकडून जप्त करण्यात येतील व त्यानंतर गाड्यांवर दावा करता येणार नाही, असे निर्देश जारी केले आहेत.
याद्या जारी-
या संदर्भातील याद्या मडगाव व वास्को उपजिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात आलेल्या आहेत. या यादीत ज्यांच्या गाड्या असतील त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयात कागदपत्रे सादर करावीत असेही सांगण्यात आलेले आहे.