पेडणे : ..अखेर हरमलमध्ये धुमाकूळ घालणारा तो बिबट्या जेरबंद!

हरमलमध्ये बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे उघड झाला होता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 10:17 am
पेडणे : ..अखेर हरमलमध्ये धुमाकूळ घालणारा तो बिबट्या जेरबंद!

पणजी : नानोस्करवाडा,ह्ररमल- पेडणे येथे हैदोस घालून रात्रीच्या वेळी कुत्रे पळवणारा तो बिबटा अखेर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात जेरबंद झाला. अंदाजे एका वर्षाच्या या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून, मुख्य वन्यजीव संरक्षकांच्या परवानगीने त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. 

मागेच, २९ मार्च रोजी, मधलावाडा-हरमल, पेडणे येथे रात्रीच्या वेळेला बिबट्याचा वावर असल्याचे उघड झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी उत्तररात्री अडीजच्या सुमारास, या बिबट्याने येथील मार्सेलीन फर्नांडिस यांच्या पाळीव कुत्र्याला पळवले. सदर प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आल्यानंतर मार्सेलीन फर्नांडिस यांनी चिंता व्यक्त केली होती. 

घटनाक्रम असा

 उत्तर रात्री २.३९ च्या सुमारास सावजाच्या शोधात निघालेल्या बिबट्याने फर्नांडिस यांच्या घरासमोरील गेटवरुन  थेट अंगणात उडी मारली. यानंतर येथे साखळीने बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर झडप घातली व त्याला उचलून जंगलात धूम ठोकली. यावेळी कुत्र्याच्या आर्त भुंकण्याने फर्नांडिस कुटुंबीय जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता येथे कुत्रा दिसला नाही. काहीवेळ अंगणात थांबून त्यांनी कुत्र्याची वाट पहिली. नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासली असता, बिबट्याचे कृत्य समोर आले. दरम्यान, त्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना झाल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सकाळी भेट दिली व जागेची पाहणी केली. त्या ठिकाणावरून जंगलपरिसर नजीकच असल्याने बिबट्या येथूनच आला असावा असा प्राथमिक कयास व्यक्त करण्यात आला. त्यानंतर येथे विविध ठिकाणी सापळे रचण्यात आले. 

नानोस्करवाडा भागातही बिबट्याचा वावर आढळून आला होता. तो बिबट्या देखील हाच असावा असा प्राथमिक कयास यावेळी स्थानिकांनी व्यक्त केला होता. यानंतर वन अधिकाऱ्यांनी नानोस्करवाड्यावर बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजराही लावला होता. अलीकडील काळात चणईवाडा भागात रात्रीच्या वेळेत कुत्र्यांचे जोरदार भुंकणे असायचे. मात्र सध्या भुंकणे सोडा,भटकी कुत्रीच कमी झाल्याचे दिसून आल्याची माहिती एका नागरिकाने दिली. बिबट्याच्या दहशतीमुळे येथे भयाण शांतता पसरलेली असते. वन खात्याने हरमलमधील या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पावले उचलल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.  

हेही वाचा