बॉम्ब निकामी पथक, श्वान पथकासह पोलीस अधिकाऱ्यांची तपासणी मोहीम
म्हापसा : बुधवारी दुपारी म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी ३ च्या कार्यालयात ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. मात्र सखोल चौकशी अंती ती केवळ अफवा असल्याचे समोर आले.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त जिल्हाधिकारी ३ पुंडलिक खोर्जुवेकर यांच्या कार्यालयाला दुपारी २.१५ वाजता कार्यालयाच्या आवारात इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) स्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल आला.
धमकीमुळे घाबरून खोर्जुवेकर यांनी तातडीने म्हापसा पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांकरवी कारवाई सुरू केली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकासह पोलीस अधिकाऱ्यांची एक टीम म्हापसा येथील सरकारी संकुलात तातडीने दाखल झाली.
संपूर्ण परिसराला घेराव घालत प्रशिक्षित स्निफर कुत्र्यांच्या मदतीने बॉम्ब निकामी करणाऱ्या तज्ञांनी परिसराची कसून तपासणी केल्यानंतर, कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना सदर ईमेल खोटा असल्याचे आढळून आले.
दहशत निर्माण केल्याबद्दल कायदेशीर कारवाई
बॉम्ब असल्याची धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले असले तरी, अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलिसांनी ईमेलचे मूळ शोधण्यासाठी आणि पाठवणाऱ्याची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू केला आहे. चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि सरकारी अधिकारी तसेच सामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याबद्दल गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करण्यात आहे.
ईमेल खोटा !
आम्ही संपूर्ण सरकारी संकुलाची कसून तपासणी केली परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नाही. हा एक बनावट, खोटा ईमेल होता," असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.