फोंडा आल्मेदा हायस्कूलचा नेत्रदीपक विजय

गोवा राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत हळदोणा सेंट थॉमसचा पराभव

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10th April, 12:33 am
फोंडा आल्मेदा हायस्कूलचा नेत्रदीपक विजय

पणजी : डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अॅण्ड यूथ अफेअर्स आयोजित गोवा राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत फोंडा येथील आल्मेदा हायस्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात त्यांनी उत्तर गोव्यातील सेंट थॉमस गर्ल्स स्कूल हळदोणाचा रोमांचक लढतीत २५-०२, २५-१९ अशा सेटमध्ये पराभव केला.
फोंडा आल्मेदा हायस्कूलच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रभावी खेळ दाखवला. साखळी सामन्यांमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी संघांवर सहज विजय मिळवले. त्यांच्या सांघिक कामगिरीचे आणि खेळाडूंच्या वैयक्तिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक झाले. अंतिम सामन्यात संघाची कर्णधार हर्षिता गडे आणि आर्या शिंक्रे यांनी आपल्या आक्रमक खेळाने आणि उत्कृष्ट नेतृत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना राधिका नाईक, कृष्णाली शेलार प्रियांशा नदार आणि सोनाक्षी ठोसरे यांनी उत्तम साथ दिली. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. उपविजेत्या सेंट थॉमस हायस्कूलनेही दुसऱ्या सत्रात कडवी झुंज दिली. मात्र, आल्मेदा विद्यालयाच्या खेळाडूंनी संयम राखत आणि उत्कृष्ट समन्वय दाखवत सलग दोन्ही सेट जिंकून बाजी मारली.
विजेत्या आल्मेदा संघाला शारीरिक शिक्षक गोविंद नावेलकर यांचे मार्गदर्शन लाभले. या उल्लेखनीय विजयी झाल्यानंतर आल्मेदा हायस्कूलच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.