क्रीडा वार्ता : कोच गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमधून तिघांची हकालपट्टी

बीसीसीआयची मोठी कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th April, 11:40 am
क्रीडा वार्ता : कोच गंभीर यांच्या सपोर्ट स्टाफमधून तिघांची हकालपट्टी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफवर बीसीसीआयने मोठी कारवाई करत तीन सदस्यांना पदावरून हटवले आहे. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारताचा झालेला पराभव आणि ड्रेसिंग रूममधील गोष्टी सातत्याने मीडियात लीक होण्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

एका माहितीनुसार, सहायक प्रशिक्षक अभिषेक नायर, फील्डिंग कोच टी. दिलीप आणि ट्रेनर सोहम देसाई यांना बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. गंभीर यांनी प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर बीसीसीआयने त्यांना आपल्या पसंतीचे सपोर्ट स्टाफ निवडण्याची मुभा दिली होती.

अभिषेक नायर केवळ आठ महिन्यांपूर्वी संघात सहभागी झाले होते. त्यांनी याआधी कोलकाता नाइट रायडर्ससाठी गंभीरसोबत काम केले आहे. टी. दिलीप आणि सोहम देसाई हे मागील तीन वर्षांपासून टीम इंडियासोबत कार्यरत आहेत. 

बीसीसीआयच्या हवाल्याने हाती आलेल्या माहितीनुसार, कसोटी फॉरमॅटमधील संघाच्या अलीकडील अपयशासोबतच ड्रेसिंग रूममधून गोपनीय माहिती सार्वजनिक होणे ही मोठी चिंता बनली होती. काही खेळाडूंनी अंतरिम कर्णधारपदासाठी लॉबिंग केल्याचेही वृत्त आहे. गौतम गंभीर यांनी यावर स्पष्टीकरण देत, या सगळ्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले होते. मात्र बीसीसीआयने संघात शिस्त राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय लवकरच नव्या सपोर्ट स्टाफची निवड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघाच्या व्यवस्थापनात आणखी बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.