अन्यथा कार्डावरून नावे वगळणार : नागरी पुरवठा खाते
पणजी : रेशन कार्डांची ई-केवायसी करण्यासाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने अंतिम मुदत जाहीर केली आहे. ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा रेशन कार्डावरून नावे वगळण्यात येतील, अशी अधिसूचना नागरी पुरवठा खात्याने जारी केली आहे.
नोव्हेंबर २०२४ मध्ये नागरी पुरवठा खात्याने अधिसूचना काढून १५ दिवसांच्या आत रेशन कार्डांसाठी ई-केवायसी पूर्ण करण्याचे सक्तीचे केले होते आणि जर ही प्रक्रिया केली नाही तर रेशन कार्डावरून लाभार्थ्यांची नावे वगळली जातील म्हणून सांगितले होते. पण या प्रक्रियेला प्रतिसाद मिळालेला नसल्याने नागरी पुरवठा खात्याने त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ दिली होती.
आता खात्याने सुधारित अधिसूचना काढून ज्या रेशन कार्ड लाभार्थ्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी ३० एप्रिल २०२५ पूर्वी ती पूर्ण करावी, असे जाहीर केले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या प्रतींसह संबंधित सोसायटीला भेट द्यावी. दिलेल्या तारखेला ई-केवायसी पूर्ण करण्यात अपयश आल्यास रेशन कार्डवरून नावे वगळली जातील. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका नागरी पुरवठा अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
यावर्षी जानेवारीपर्यंत एनएफएसए अंतर्गत असलेली अंत्योदय अन्न योजना आणि प्रायॉरिटी हाऊसहोल्ड कार्डाचे ४,७८,३०५ लाभार्थी आहेत. त्यापैकी ६८.७३ टक्के म्हणजे ३,२८,७६१ लाभार्थ्यांनी इ-केवायसी पूर्ण केली आहे. गरिबी रेषेखाली ५,९३,१२५ पैकी ४३.५ टक्के म्हणजे २,८५,२७९ लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
प्रक्रिया सोपी
रेशन कार्डावर चार लाभार्थ्यांची नावे असतील, तर त्या प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या आधार कार्डसह सोसायटीवर जावे. तेथे पीओएस मशीनवर आपला अंगठा लावून ई-केवायसी करून घ्यावी. ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि एकाच वेळी करायला हवी. रेशन कार्डावर असलेल्या नावावर आधार नंबर जुळल्यानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.