शिक्षण : नवे शैक्षणिक वर्ष येत्या ७ एप्रिलपासूनच होणार सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th April, 04:33 pm
शिक्षण : नवे शैक्षणिक वर्ष येत्या ७ एप्रिलपासूनच होणार सुरू

पणजी : इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे नवे शैक्षणिक वर्ष येत्या ७ एप्रिलपासूनच सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय मान्य करून या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळली. 

आता इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे नवे शैक्षणिक वर्ष येत्या ७ एप्रिलपासून, तर, पहिली ते पाचवी आणि अकरावीचे शैक्षणिक वर्ष येत्या जूनपासून सुरू होईल, असा आदेश शिक्षण खात्याने  शुक्रवारी २८ मार्च रोजी जारी केला होता. त्यामुळे सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना येत्या ७ एप्रिलपासून वर्गांत हजेरी लावावी लागणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. या धोरणानुसार इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीचे यंदाचे शैक्षणिक वर्ष येत्या १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतलेला होता. परंतु, या निर्णयाला काही भागांतील पालकांनी ​विरोध दर्शवत उच्च न्यायालयात या विरोधात याचिका दाखल केली होती. एप्रिल महिन्यात तापमान अधिक असते. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊ शकतो तसेच या काळात केवळ ८ ते ११ या वेळेत वर्ग भरवण्यात येत असतील, तर शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिलपासून सुरू करण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका काही पालकांनी घेतलेली होती. 

हेही वाचा