फोंडा : दामू-रवी भेटीमुळे मंत्रिमंडळ फेरबदल पुन्हा चर्चेत

दोन्ही नेत्यांच्या आकस्मिक भेटीमुळे चर्चेला उधाण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th April, 02:40 pm
फोंडा : दामू-रवी भेटीमुळे मंत्रिमंडळ फेरबदल पुन्हा चर्चेत

पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि कृषीमंत्री रवी नाईक यांच्यात फोंड्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ही बैठक फोंड्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यासंदर्भात होती, अशी माहिती दामू नाईक यांनी दिली असून, मंत्रिमंडळासंबंधी कोणतीही चर्चा झाल्याचे त्यांनी नाकारले.

गुरुवारी सकाळी कृषीमंत्री रवी नाईक यांच्या फोंड्यातील एका हॉटेलमध्ये ही गुप्त बैठक पार पडली. मात्र, कार्यकर्ता मेळाव्यासंदर्भातील बैठक इतकी गोपनीय का होती, हा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्ली वाऱ्याही केल्या आहेत. कोणत्या मंत्र्यांना वगळायचे, यावर एकवाक्यता नसल्यामुळे फेरबदलाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे.

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे सध्या एक मंत्रिपद आणि एक महामंडळाचे अध्यक्षपद आहे. सुकाणू समितीने मगोच्या मंत्रिपदाला आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. युती आणि मंत्रिपद टिकवण्यासाठी मगोनेही प्रयत्न सुरू केल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दामू नाईक आणि रवी नाईक यांची ही आकस्मिक व गुप्त भेट या चर्चांना पुन्हा एकदा गती देणारी ठरली आहे.

दामू नाईक हे पक्षाचे गोवा अध्यक्ष आहेत. अध्यक्ष या नात्याने आम्ही पक्षाच्या कामाबद्दल एक बैठक घेतली. फोंडा मतदारसंघात पक्षाची रॅली काढण्याचे नियोजन आहे. यावरही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत हे निर्णय घेतील. याविषयी आपल्याला माहिती नाही. - रवी नाईक, कृषीमंत्री      

हेही वाचा