म्हापसा : आंगड-म्हापसा येथील जुन्या बाजारपेठेतील अलंकार थिएटरजवळील इमारतीत प्रिन्स चड्डा यांच्या ‘वी केअर २४/७’ सुपर मार्केटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली . या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग मार्केटच्या मागील बाजूकडून पसरली. सुरुवातीला दुकानातील दोन कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती भडकली आणि संपूर्ण मालाला लागली. काच फुटताच कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेत जीव वाचवला.
या आगीत किराणा, सौंदर्य प्रसाधने, शीतपेय, स्टेशनरी, संगणक, वातानुकूलित यंत्रणा, दुकानातील इंटेरिअर व काउंटर जळाले. दुकानाबाहेर पार्क केलेल्या दुचाकीलाही आगीची झळ पोहोचली. सुमारे ६० लाखांचा माल विक्रीस ठेवण्यात आला होता, यातील बहुतांश माल जळून खाक झाला आहे.
म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश गोवेकर, हवालदार विष्णू गावस आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तासभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.