नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी (९ एप्रिल) एक धक्कादायक घटना घडली. एअर इंडिया एक्सप्रेसचा २८ वर्षीय पायलट अरमान याचा विमान लँड केल्यानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. श्रीनगरहून दिल्लीकडे आलेले हे विमान नेहमीप्रमाणे लँड झाले. मात्र त्यानंतर अरमानला अचानक त्रास होऊ लागला.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लँडिंगनंतर कॉकपिटमध्येच त्याला उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर तो डिस्पॅच ऑफिसमध्ये कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अरमानचे नुकतेच लग्न झाले होते, ही माहिती समोर आल्यानंतर सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी पोस्टमॉर्टेमचा अहवाल येणे आवश्यक आहे. मात्र, वैमानिकांवर असलेल्या ताणामुळे अशा घटना घडत असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षण आणि तणावमुक्त वातावरणाची गरज!
या घटनांनी विमानप्रवासातील वैद्यकीय सुविधा, तणावपूर्ण वातावरण आणि क्रू मेंबर्सचे प्रशिक्षण यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वैमानिकांच्या निधनापासून ते वरिष्ठ नागरिकांच्या मृत्यूपर्यंत, प्रत्येक घटनेमधून प्रशासनाने धडा घेणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
२५ दिवसांत विमानप्रवासात तीन मृत्यू; प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!
गेल्या २५ दिवसांत देशातील विविध विमान प्रवासांदरम्यान घडलेल्या घटनांनी प्रवाशांच्या वैद्यकीय सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मुंबई, पाटणा आणि दिल्लीहून उड्डाण केलेल्या विमानांमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही एक गंभीर बाब मानली जात आहे.
६ एप्रिल : विमानात ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू
मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानात प्रवास करत असलेल्या ८९ वर्षीय सुशीला देवी यांचा तब्येत बिघडल्यामुळे मृत्यू झाला. यानंतर, विमानाचे छत्रपती संभाजीनगर येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी होत्या.
२९ मार्च : पत्नीसमोर पतीचा मृत्यू, लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग
पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट 6E 2163 मध्ये प्रवास करत असलेल्या प्रा. सतीश चंद्र बर्मन (नलबारी, आसाम) यांचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. पत्नी आणि चुलत भावासोबत प्रवास करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. लखनौ येथे तातडीने लँडिंग करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
२१ मार्च : पाणी प्यायल्यानंतर प्रवासी बेशुद्ध, नंतर मृत
दिल्लीहून लखनौकडे येणाऱ्या AI-4825 फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या आसिफ अन्सारी दौला (गोपालगंज, बिहार) यांना पाणी प्यायल्यानंतर अचानक त्रास होऊ लागला. सीटवरच ते बेशुद्ध झाले. लँडिंगनंतर सर्व प्रवासी उतरले, मात्र ते तसेच बसून राहिले. वैद्यकीय पथक पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
बातमी अपडेट होत आहे.