गोवा : आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महसुलाचे आकडे बदलले

संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी : आमदार व्हेंझी व्हिएगस

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 04:14 pm
गोवा : आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महसुलाचे आकडे बदलले

पणजी : आर्थिक सर्वेक्षण अहवाल विधानसभेत सादर केल्यानंतर वीज व नगरनियोजन खात्याच्या महसुलाच्या आकड्यांत बदल करण्यात आला आहे. सभागृहात अहवाल सादर झाल्यानंतर महसुलाच्या आकडेवारीत झालेले बदल हा गंभीर प्रकार असून याप्रकरणी चौकशीची मागणी आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली. चौकशीची मागणी करावी असे पत्र विधानसभा सचिवांना लिहिले असून हा विषय पक्षातर्फे केंद्रीय पातळीवर नेणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी पणजीत पत्रकार परिषद घेतली. राज्याच्या २०२४ - २५ आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल २६ मार्च रोजी सभागृहात सादर करण्यात आला. या अहवालातील पान क्रमांक २८ वर नगरनियोजन, वीज, वाहतूक तसेच इतर खात्यांच्या गेल्या पाच वर्षातील महसुलाची आकडेवारी देण्यात आली आहे. ज्यावेळी सभागृहात अहवाल सादर झाला तेव्हा २०२४ - २५ (डिसेंबरपर्यंत) वर्षातील नगरनियोजन खात्याचा महसूल ११०९२.३९ कोटी दर्शविलेला आहे. तसेच वीज खात्याचा २०२४ - २५ (डिसेंबरपर्यंतचा ) महसूल ६००.०४ कोटी दर्शविलेला आहे. यानंतर आता वेबसायटवरील आर्थिक सर्वेक्षण अहवालात नगरनियोजन खात्याचा २०२४ - २५ वर्षासाठीचा महसूल ११०.९२ कोटी रूपये आहे. वीज खात्याच्या २०२४ - २५ वर्षासाठीचा महसूल २४७४.५८ कोटी रूपये नमूद केलेला आहे. 

अहवालातील बरोबर आकडे कोणते? आकडेवारीत बदल कोणी केले व का केले? चुकीची दुरूस्ती करण्यात आली का? असे बरेच प्रश्न निर्माण होतात. आकडेवारी बदलणे वा चुकीची दुरूस्ती करण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करावा लागतो. यापैकी कोणतीच गोष्ट करण्यात आलेली नाही. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आमदार या नात्याने मी विधानसभा सचिवांना पत्र लिहून केलेली आहे. सभापतींना सुद्धा या प्रकाराची कल्पना मी देणार आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालाच्या आकडेवारीतील बदल हा गंभीर प्रकार असून आम आदमी पक्ष हा विषय संसदेत उपस्थित करणार आहे, असे आमदार वेंझी व्हिएगस यानी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा