प्रशासन : चलन देण्याचा अधिकार ‍आता ‍केवळ निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच : मुख्यमंत्री

इतर पोलिसांनी चलन दिल्याचे आढळल्यास निलंबित करण्याचाही इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th April, 03:44 pm
प्रशासन : चलन देण्याचा अधिकार ‍आता ‍केवळ निरीक्षक, उपनिरीक्षकांनाच : मुख्यमंत्री

पणजी : यापुढे दिवसभरात चलन देण्याचा ‍अधिकार केवळ पोलीस निरीक्षकाला, तर रात्रीच्यावेळी पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांनाच असेल. इतर पोलिसांना चलन देण्याचा अधिकार नसेल. तसा प्रयत्न कुणी केल्यास त्या पोलिसाचा फोटो संबंधित पोलीस स्थानकाला पाठवा. त्याला निलंबित करू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

स्थानिक तसेच राज्यात येणार्‍या पर्यटकांकडून चलन‍ांसंदर्भातील तक्रारी वाढत आहेत. काही पोलीस विनाकारण चलन देत असल्याचा आरोप पर्यटकांकडून होत आहे. अशा गोष्टींचा राज्याच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये यासाठीच यापुढे चलन देण्याचे अधिकार पोलीस स्थानकांचे  निरीक्षक आणि उपनिरीक्षकांना देण्यात आले आहेत. निरीक्षक आणि उपनिरीक्षक वगळता अन्य कोणी पोलीस चलन देत असल्याचे आढळून आल्यास त्याचा फोटो संबंधित पोलीस स्थानकाला पाठवून द्या. त्यानंतर त्याच्यावर कडक क‍ारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्याला सेवेतून निलंबितही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हण‍ाले. 

दरम्यान, वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी वाहन चालकांना चलन देत असताना निरीक्षक तसेच उपनिरीक्षक‍ांकडे बॉडी कॅमेरा असणेही महत्त्वाचे आहे, असेही त्य‍ांनी नमूद केले.

किनारे, रस्त्य‍ांकडेला जेवण करणार्‍य‍ांवर होणार कारवाई

राज्यात येणारे काही पर्यटक किनारी भाग तसेच रस्त्यांच्या कडेला जेवण बनवत आहेत. त्यामुळे अशा भागांत कचर्‍याचे साम्राज्य वाढत चालले आहे. यापुढे राज्यात येणार्‍या पर्यटक‍ांचे असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. त्य‍‍ांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यांच्याकडील गॅस सिलिंडर तसेच स्टोव्ह सीमेवरच जप्त करण्यात येतील, असा इशाराही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

हेही वाचा