इच्छुकांना ११ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करण्याची मुभा
पणजी : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदासाठी पर्यावरण खात्याने चौथ्यांदा जाहिरात दिली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाबरोबर सदस्य सचिवपद भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदस्य सचिवपदासाठी यापूर्वी तीन वेळा जाहिरात दिली होती.
पहिल्या जाहिरातीनंतर ज्यांनी अर्ज सादर केले आहेत, त्यांचे अर्ज ग्राह्य धरले आहेत. त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ११ एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास मुदत आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. आतापर्यंत त्या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. अध्यक्ष महेश पाटील यांची मुदत जानेवारी महिन्यात संपली. त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी लेविन्सन मार्टिन, श्रीनेत कोठावळे, डॉ. प्रदीप सरमोकादम यांच्या नावांची चर्चा आहे.
सदस्य सचिवपदासाठी पर्यावरण खात्याने सर्वप्रथम २२ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात दिली होती. त्यानंतर २० डिसेंबर २०२४ रोजी दुसऱ्यांदा जाहिरात दिली होती. पहिल्या जाहिरातीनंतर अर्ज केलेल्या इच्छुकांनी पुन्हा अर्ज करू नये, अशी सूचना केली होती. त्यानंतर २ जानेवारी २०२५ रोजी तिसऱ्यांदा जाहिरात दिली होती. आता अध्यक्ष तसेच सदस्य सचिवपदाची मुदत संपल्यानंतर चौथ्यांदा जाहिरात दिली आहे. सध्याच्या सदस्य सचिव शमिला मोंतेरो यांच्यासह अनेकांनी अर्ज केले आहेत.
सदस्य सचिवपदासाठी इतर पात्रतेसह कोकणीचे ज्ञान सक्तीचे आहे. यामुळे मूळ गोमंतकीय व्यक्तीच सदस्य सचिवपदासाठी पात्र ठरणार आहे.