हरमल : समुद्रकिनारा आणि जवळच्या भागात विदेशी तळीरामांचा उपद्रव वाढला

विदेशी पर्यटकांना, देशी दारूची चटक लागली असून, रात्रीच्या वेळी तर हे लोक तर्राट होऊन सैराट होत थेट बारांच्या ओसरीवरच ताणून देत आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th April, 02:47 pm
हरमल : समुद्रकिनारा आणि जवळच्या भागात विदेशी तळीरामांचा उपद्रव वाढला

पेडणे : राज्यात पर्यटन हंगाम जोमात सुरू आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर देशी विदेशी पर्यटकांची  कमी जास्त प्रमाणात गर्दी दृष्टीस पडत आहे. ही गोष्ट राज्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने चांगलीच म्हणावी लागेल. पण, हरमल भागात अजून एक दृश्य दुशतीस पडत आहे. या भागात विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. ते उघड्या बोडक्या अंगाने येथे समुद्रकिनारी स्वच्छंद फिरताना दिसतात. मात्र सायंकाळ झाली की त्यांना दारूची तलफ येते. 

 विशेष म्हणजे हरमल-मधलावाडा भागात वास्तव्यास असलेल्या काही विदेशी पर्यटकांना देशी दारूची चटक लागली असून, रात्रीच्या वेळी तर्राट होऊन हे बावटे सैराट होत बारांच्या ओसरीवरच ताणून देत आहेत. दिवस रात्र दारूच्या बाटल्या रिचवत असल्याने अनेकदा ते शॉप व रेस्टॉरंटच्या ओसरीवरच झोपलेल्या स्थितीत असतात. कित्येकदा काहीजण ओसरीवरच नैसर्गिक विधी करतात.  दुसऱ्या दिवशी त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरत असल्याने स्थानिकांची डोकेदुखी वाढली असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले. 

अलीकडे या भागात वास्तव्यास असलेला एक पर्यटक दारूच्या प्रचंड अधीन गेला आहे. हा दारू खरेदीसाठी दिवसातून किमान दोनदा येत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. गेल्यावर्षी असाच एक पर्यटक गोव्यात मिळणाऱ्या स्वस्त दारूच्या आहारी गेला होता. अनेक ठिकाणी पडून त्याच्या अंगावर अनेक जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी अनेकदा त्यास ताब्यात घेतले, मात्र इस्पितळात उपचार केल्यानंतर तो पळून जात असे. शेवटी त्या पर्यटकाची रवानगी मायदेशात करण्यात आली. 

येथील काही पर्यटकांचा अजून एक अनुभव म्हणजे, पोलीस त्यांना उचलून नेतात, मात्र दुसऱ्या दिवशी हे  पुन्हा त्याच ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे अशा मद्यपी पर्यटकांची रवानगी त्वरित सुधारगृहात करावी अशी मागणी माजी पंच प्रविण वायंगणकर यांनी केली आहे. हरमल भागात पोलीस व आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनीही दारुबाज पर्यटकांचा सर्व्हे करून त्यांना सुधारगृहात किंवा त्यांच्या-त्यांच्या मायदेशात रवानगी करावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा