गोव्यातील वृद्ध महिला जखमी : गोव्यातून पुण्यात जात होते उपचारासाठी
सावंतवाडी : गोव्यातून पुण्याकडे जात असलेल्या खासगी रुग्णवाहिकेला सावंतवाडी-माजगाव येथील हॉटेल माटवजवळ अपघात झाला. रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने चालकाचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटल्यामुळे रुग्णवाहिका पलटी झाली. या अपघातात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेत असलेल्या वृद्ध महिलेला दुखापत झाली असून तिला उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले आहे.
यामध्ये वृद्धा उबाल्डा डिसाेझा (७९), परिचारिका बेनिता अल्मेडा (६१), जेसीता फर्नांडिस (५०), इसीजा फर्नांडिस (५०) या चौघांनाही किरकोळ दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू करत जखमी महिला व तिच्यासोबत असलेल्या परिचारिकांना १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात पोहोचवले. या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने रुग्ण, परिचारिका व चालक यांना गंभीर इजा झाली नाही.