मुंबई : आता समुद्रमार्गे अवघ्या सहा तासांत गाठता येणार मुंबई

रो-रो सेवेमार्फत होणार जलवाहतूक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th April, 10:39 am
मुंबई : आता समुद्रमार्गे अवघ्या सहा तासांत गाठता येणार मुंबई

मुंबई : देशांतर्गत पर्यटन क्षेत्रात  गेल्या दोन वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. देशातील विविध राज्यांनी एकत्र येत अनेक प्रकारचे सामंजस्य करार करार केले आहेत. याच अनुषंगाने गोवा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांदरम्यान प्रवाशांसाठी एक अभिनव अशी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. 

 'मुंबई टू गोवा' हा  रस्ता, विमान आणि रेल्वेमार्गे करता येतो. मुंबई ते मांडवा दरम्यानच्या रो-रो (रोल-ऑन, रोल-ऑफ) फेरीसेवेसाठी ओळखली जाणारी एम२एम ही कंपनी आता, अति जलद रो-रो बोट सेवा थेट समुद्रमार्गे मुंबई टू गोवा प्रवास सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अशी जलवाहतूक बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीच्या माध्यमातून पूर्वी मुंबई ते गोवा दरम्यान सुरू करण्यात आली होती. मुंबईतून निघालेले जहाज रत्नागिरीनंतर जैतापूर, मालवण, वेंगुर्ले या बंदरांवर थांबा घेत ती जहाजे पुढे गोव्यात यायची. १९६४ नंतर ही जलवाहतूक बंद झाली. आता १८० वर्षे जुन्या पद्धतीची ही जलवाहतूक व्यवस्था पुन्हा सुरू होणार आहे.

एका माहितीनुसार, त्यासाठी एम२एम  फेरीजने इटलीतून १५ वर्षे जुने असलेले रोपॅक्स जहाज विकत घेतले होते. मुंबईत या जहाजाच्या डागडुजीचे काम सुरू होते. या जहाजाच्या आवश्यक चाचण्या घेण्यात आल्यानंतर कंपनीने ऑपरेशन सुरू करण्यासाठी जहाज वाहतूक महासंचालक आणि इतर अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजुरीसाठी अर्ज केला.

फेरी मार्ग आणि विस्तार योजनेबद्दल थोडक्यात 

एम२एम फेरीजच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,  माझगाव (मुंबई) येथील फेरी व्हार्फ ते मुरगाव बंदर प्राधिकरण (गोवा) पर्यंत रोपॅक्स सेवा चालवण्याची योजना आहे. चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी पणजी येथे डॉकिंगला परवानगी मिळावी यासाठी देखील ते गोवा सरकारशी चर्चा करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना पूर्णत्वास आल्यास दोन्ही राज्यांच्या पर्यटन क्षेत्रात विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले. 

दरम्यान मुंबई-गोवा रो-रो फेरीची ट्रायल रन झाली असून सुरुवातीच्या चाचणीत मुंबई ते गोवा प्रवास ६.५ तासांत पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर माजगाव डॉक ते पणजी जेटी डॉकपर्यंत फेरी सेवा सुरू होईल. दरम्यान, या परवानगीसाठी गोवा सरकारशी चर्चा सुरू आहे.

जहाजाची क्षमता आणि भाडे दर 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन रोपॅक्स जहाजात ६२० प्रवासी आणि ६० गाड्या बसू शकतात. भाडे दराचा निर्णय अद्याप झालेला नसला तरी, केंद्र सरकार इंधन आणि कर सवलतींवर सबसिडी देईल,यामुळे सेवा अधिक परवडणारी होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, एम२एम फेरीजचा अर्ज पुनरावलोकनाधीन आहे, असे शिपिंगचे महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी म्हटले आहे. तर, कागदपत्रे आता पुढील मंजुरीसाठी भारतीय शिपिंग रजिस्ट्रारमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य जहाज सर्वेक्षणकर्ता प्रदीप सुधाकर यांनी दिली. गोव्याचा विचार करता, येथे गेली अनेक दशके लोक फेरीसेवेच्या आधारे वावरत आहेत. या सर्व फेरी नदी परिवहन खात्यांतर्गत येतात. 

दरम्यान, मार्च २०२५ पर्यंत रो-रो सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आता एप्रिलअखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला ही वाहतूक सुरू होऊ शकते. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही रो-रो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या रो-रो सेवेमुळे महाराष्ट्र आणि गोवा दोन्ही राज्यांच्या पर्यटनासाठी फायदा होणार आहे. 

हेही वाचा