मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : मडगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

मडगाव येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
मडगाव : राज्यातील व देशातील भाजप सरकारनेच पायाभूत सुविधांसह प्रत्येक घटकाचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून योजना व निर्णय घेतलेले आहेत. कार्यकर्त्यांनी भाजपने केलेले कार्य व योजना यांची योग्य माहिती घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मडगाव येथील दैवज्ञ भवन येथे कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, खासदार श्रीपाद नाईक यांच्यासह इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यात व देशात भाजप सरकारकडून झालेल्या विकासाबाबत माहिती दिली. महिलांना राजकीय आरक्षण भाजपच्या कालावधीतच मिळालेले आहे. राज्य सरकारकडून महिला युवा व इतर सर्व घटकांसाठी विविध योजना तयार करण्यात आलेल्या आहेत. राज्यातील पायाभूत सुविधांकडे लक्ष देताना मानवी विकासाकडे लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून केवळ लोकांची दिशाभूल करून मते मिळवण्याचे काम केले जाते. मात्र, भाजप लोकांसाठी काम करून विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढते. सत्तेत कायम राहण्यासाठी देशात आणीबाणीही काँग्रेसने लागू केली होती त्यामुळे राज्यातही अनेक जणांना तुरुंगात राहावे लागले होते.
भाजप संविधान बदलणार असे खोटे सांगून निवडणुकांत विजय मिळवण्याचा काँग्रेसचा डाव होता. मात्र, मतदारांनी भाजपवरच विश्वास दर्शवला असल्याचे निवडणुकांच्या निकालातून दिसून आले आहे. बऱ्याच वेळा राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी केलेली विकासात्मक कामे व प्रगती याबाबतची माहिती पुस्तिका यांचे वाटप केले जाते. मात्र, त्या पुस्तिका वरचेवर चाळून बाजूला ठेवण्यात येतात तसे न होता भाजपने राज्यात व देशात केलेल्या कार्याचा पूर्ण आढावा व माहिती कार्यकर्त्यांनी घेऊन ते प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये २७ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. नाईक यांनी सांगितले की, राज्यातील ४० ही मतदारसंघात भाजप पक्ष मजबूत बनवण्यात येत आहे. चाळीसही मतदारसंघात भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे करण्याची आणि सर्व ४० ही मतदारसंघातून निवडणुका जिंकण्याची भाजपची क्षमता आहे. कार्यकर्त्यांनी भाजपने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत व पक्षाच्या कामात हेवेदावे टाळून पक्षासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
‘वन नेशन, वन इलेक्शन’ बाबत ठराव
भाजपच्या मडगाव येथील मेळाव्यात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ व्हावे यासाठीचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, देशाची प्रगती होण्यासाठी तसेच पुन्हा पुन्हा होणाऱ्या निवडणुका टाळून वेळही वाचावा व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ अत्यावश्यक आहे. याबाबतचा ठराव संमत करून राष्ट्रपतींकडे पाठविण्यात येईल, असे सांगण्यात आले.