गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण तिपटीहून कमी

डेंग्यूच्या हॉटस्पॉट ठिकाणांचे मॅपिंग केल्यामुळे रुग्ण संख्या घटली : महात्मे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th April, 12:05 am
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण तिपटीहून कमी

पणजी : राज्यात जानेवारी ते मार्च २०२४ च्या तुलनेत २०२५ च्या तीन महिन्यांत डेंग्यू रुग्णांच्या संख्येत तिपटीहून अधिक घट झाली आहे. जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये राज्यात डेंग्यूचे ७६ रुग्ण आढळले होते. तर २०२५ मध्ये याच तीन महिन्यांत डेंग्यूचे २३ रुग्ण आढळले. डेंग्यूच्या हॉटस्पॉट ठिकाणांचे मॅपिंग करून तिथे खात्यातर्फे करण्यात आलेल्या जागृतीमुळे यंदा डेंग्यूचे रुग्ण कमी आढळल्याची माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
राज्यात जानेवारी २०२५ मध्ये ७, फेब्रुवारीमध्ये ९, तर मार्चमध्ये ७ रुग्ण आढळले होते. मार्चमधील ७ पैकी ५ उत्तर गोव्यात, तर २ रुग्ण दक्षिण गोव्यातील होते. यामध्ये म्हापसा, हळदोणे, कासारवर्णे येथे प्रत्येकी १, कोलवाळमध्ये २, तर वास्को येथे २ रुग्ण आढळले होते. बहुतेक रुग्ण हे स्थलांतरित कामगार वस्तीमधील किंवा बांधकाम प्रकल्पात राहणाऱ्या कामगार आहेत. येथे उघड्यावर पाणी साठवून ठेवल्याने डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू रुग्ण आढळले आहेत.
राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता अधिक असते. या दरम्यान रुग्ण संख्या वाढू नये म्हणून खात्याने अधिक दक्षता घेतली आहे. यानुसार खात्यातर्फे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी स्वच्छता, घरोघरी जाऊन जागृती, औषध फवारणी, डासांची वस्ती नष्ट करणे अशी विविध कामे सुरू आहेत. विशेष करून बांधकाम प्रकल्प स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांमध्ये खात्यातर्फे कामे केली जात असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
आरोग्य खात्याच्या प्रयत्नात अन्य खात्यांशी मदत देखील आवश्यक आहे. यासाठी आरोग्य खाते समन्वय कार्यशाळा आयोजित करणार आहे. तसेच पंच, नगरसेवक, शिक्षक, अन्य नोडल अधिकारी यांच्यासाठी देखील कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या व्यक्तींनी आठवड्यातून एकदा आपला परिसर तपासणे आवश्यक आहे. कचरा, उघड्यावर पडलेले टायर, पाणी साचू न देणे, साठवलेले पाणी झाकून ठेवणे, परिसर वेळोवेळी स्वच्छ करणे अशा किमान गोष्टी केल्यास डेंग्यूचे रुग्ण कमी होतील, असे डॉ. महात्मे यांनी स्पष्ट केले.
दुखणे अंगावर काढू नका
डॉ. महात्मे यांनी सांगितले की, अनेकदा तापाकडे दुर्लक्ष केले जाते. औषधे खाऊन ताप अंगावर काढला जातो. मात्र, हा डेंग्यूचा ताप असू शकतो. तापासह उलट्या, पोटात दुखणे, अंग थंड पडणे, अती घाम येणे अशी लक्षणे दिसत असल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट द्यावी. येथे मोफत आणि चांगल्या दर्जाचे उपचार उपलब्ध आहेत.


हेही वाचा