चार वर्षांत वाढले रुग्ण : मूत्रपिंड, मूत्राशय, गर्भाशयाच्या कर्करोगात वाढ
पणजी : गेल्या काही वर्षांत राज्यातील कॅन्सर रुग्णांत वाढ होत आहे. यात प्रामुख्याने मूत्र, जननमार्ग प्रणालीचा कॅन्सर वाढला आहे. यामध्ये मूत्रपिंड, प्रोस्टेट, मूत्राशय, वृषण, योनीमार्ग, गर्भाशयाचे मुख, ओटीपोटाचा कर्करोग यांचा समावेश आहे. ही आकडेवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कॅन्सर रुग्णांची आहे.
वरील कालावधीत राज्यात फुफ्फुस, त्वचा, डोके आणि गळ्याशी संबधित कॅन्सरचे रुग्णदेखील वाढले आहेत. राज्यात २०२० मध्ये गोमेकॉमध्ये कॅन्सरचे एकूण ९४९ रुग्ण आढळले होते. यातील १० टक्के रुग्णांना (९५) मूत्रजननमार्ग प्रणालीचा कॅन्सर झाला होता. २०२४ मधील एकूण १४०९ रुग्णांपैकी १५.५ टक्के रुग्णांना (२१९) मूत्रजननमार्ग प्रणालीचा कॅन्सर होता. २०२० मध्ये डोके आणि गळ्याशी संबधित १५.८ टक्के रुग्ण होते. २०२४ मध्ये ही टक्केवारी वाढून १६.५ टक्के झाली.
याशिवाय २०२० मधील एकूण ९४९ रुग्णांपैकी ४.५ टक्के रुग्णांना (४३) फुफ्फुसाचा कॅन्सर होता. २०२४ मधील १४०९ रुग्णांपैकी ६.५ टक्के रुग्णांना (९१) फुफ्फुसाचा कॅन्सर होता. २०२० च्या तुलनेत २०२४ मध्ये त्वचा आणि पेशीच्या कॅन्सर रुग्णांची टक्केवारी ०.४ वरून १.७ टक्के झाली. तसेच २०२० च्या तुलनेत २०२४ मध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण ०.१ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये आतडी, अन्ननलिका व पोटाच्या अन्य कॅन्सरचा समावेश आहे. वरील कॅन्सरचे प्रकार वगळता अन्य कॅन्सर रुग्णांत ५.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.
स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक
उत्तरानुसार राज्यात २०२० ते २०२४ दरम्यान अन्य कॅन्सरच्या तुलनेत स्तनांच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक होते. वरील कालावधीत एकूण ५८१६ कॅन्सर रुग्णांपैकी १४८३ (२५.५० टक्के) हे स्तनांच्या कॅन्सरचे होते. या दरम्यान रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण ७.८ टक्क्यांनी कमी झाले आहे.