पणजी : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी राजभवनवर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीमुळे मंत्रीमंडळ फेरबदल व नव्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले.
वास्तुशिल्पकला, संगीत, फार्मसी व फाईन आर्टस महाविद्यालयांचे गोवा विद्यापीठ कॅम्पसमध्ये स्थलांतरण होणार आहे. विद्यापीठाचे कुलपती या नात्याने या विषयावर राज्यपालांकडे मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वास्तुशिल्पकला महाविद्यालयासह चार महाविद्यालयांचे विद्यापीठ कॅम्पसमध्ये स्थलांतरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली होती.
मुख्यमंत्र्यांकडून भाजप मेळाव्यात होत असलेली वक्तव्ये तसेच आमदार-मंत्र्यांशी होणाऱ्या भेटीगाठींमुळे मंत्रिमंडळ फेरबदल चर्चेला उधाण आले आहे. साळगाव येथील भाजप मेळाव्यात आमदार केदार नायक यांचे प्रमोशन होणे गरजेचे असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी केले. यापूर्वी कळंगुट येथील मेळाव्यात मायकल लोबो यांच्या कार्याची दखल घेउन योग्य ते पद त्याना देणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. यामुळे मंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या यादीत आणखी नावांची भर पडत आहे.
दरम्यान, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली. भेटीत राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दामू नाईक यांनी दिली. दिल्लीत मंत्री सुदीन ढवळीकर यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर मगो अध्यक्षांनी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांची भेट घेतली.