पणजी: २०२४-२५ या आर्थिक वर्षात गोव्याच्या अर्थव्यवस्थेने विविध क्षेत्रांत चांगली वाढ नोंदवली आहे. ३१ मार्चपर्यंत एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन १०.४ टक्क्यांनी वाढून ७,१४६ कोटी रुपये झाले आहे, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
गोव्याचे जीएसटी संकलन राष्ट्रीय सरासरी म्हणून नोंदवलेल्या १०टक्के वाढीच्या आसपास आहे. मासिक आधारावर, गोव्याने मार्चमध्ये जीएसटी संकलनात २० टक्के वाढ नोंदवली आहे. एका वर्षापूर्वी ५६५ कोटी रुपये महसूल जमा झाला होता तो यंदा ६८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे जीएसटी संकलन केंद्र आणि राज्य यांच्यात विभागले गेले आहे. आयजीएसटीमध्ये भरलेल्या वाट्यासह गोव्याचा एकत्रित जीएसटी महसूल, संपूर्ण वर्षासाठी १०टक्के वाढून ४,५१५ कोटी रुपये इतका झालाआहे. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वी याच महिन्यात आयजीएसटी महसूल हा ४,१२० कोटी रुपये होता.
अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, केंद्रीय जीएसटी कार्यालयात १८,१६४ जीएसटी करदात्यांची नोंदणी झाली आहे आणि गोव्याच्या राज्य जीएसटी आयुक्तांकडे २८,२०९ जीएसटी करदात्यांची नोंदणी झाली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर , राज्य वस्तू आणि सेवा कर, आयजीएसटी आणि उपकर अंतर्गत गोव्यात ७,१४६ कोटी रुपये जमा झाले.