‘टेस्ट’, ‘अदृश्यम २’ ते ‘टच मी नॉट’ : ओटीटीवर मनोरंजनाचा खजिना
आज ओटीटी आणि चित्रपटगृहात काही उत्तम चित्रपट, तसेच वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये टेस्ट, अदृश्यम २, चमक : द कन्क्लुजन, टच मी नॉट आदींचा समावेश आहे.
टेस्ट । नेटफ्लिक्स
ही कथा तीन लोकांची आहे, ज्यांची चेन्नईमध्ये एका ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामन्यात भेट होते. त्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागतात, ज्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. या चित्रपटात आर. माधवन, नयनतारा, सिद्धार्थ व मीरा जास्मिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदी भाषेसह सर्व दाक्षिणात्य भाषा म्हणजेच तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अदृश्यम २ । सोनी लिव्ह
‘अदृश्यम २’मध्ये टॉप सीक्रेट एजंटची कहाणी पाहायला मिळणार आहे. हे एजंट काही धोकादायक घटना घडण्यापूर्वीच ती थांबवण्याचे काम करतात. या वेब सीरिजमध्ये पूजा गौर आणि एजाज खान हे प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चमक : द कन्क्लुजन । सोनी लिव्ह
‘चमक : द कन्क्लुजन’ची ही गोष्ट काला या व्यक्तीवर आधारित आहे, ज्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. तसेच कुटुंबाच्या वारशामागील सत्य उघड करायचे आहे. मनोज पाहवा, गिप्पी ग्रेवाल, परमवीर चीमा, मोहित मलिक, ईशा तलवार यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
टच मी नॉट । जिओ हॉटस्टार
टच मी नॉट ही एका तरुण मुलाची गोष्ट आहे. या मुलाकडे स्पर्शाची अलौकिक शक्ती असते आणि त्या शक्तीचा वापर तो काही गुंतागुंतीच्या केसेस सोडवण्यासाठी करतो. तो एक टीम तयार करतो. या सगळ्यात एक खुनी त्याचा पाठलाग करतो. या शोमध्ये नवदीप, दीक्षित शेट्टी, बबलू पृथ्वीराज, कोमली प्रसाद हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
कर्मा । नेटफ्लिक्स
कर्मा हा एक रोमांचक कोरियन चित्रपट आहे. जो एका अपघातानंतर कर्म आणि गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेल्या सहा लोकांची कथा सांगतो. या कोरियन चित्रपटात पार्क हे-सू, शिन मिन-ए, ली ही-जून, किम सुंग-क्युन, ली क्वांग-सू आणि गोंग सेउंग-येओन यांच्या प्रमूख भूमिका आहेत.
ए माइनक्राफ्ट मुव्ही । थिएटर
हा अमेरिकन फॅन्टसी अॅडव्हेंचर कॉमेडी चित्रपट आहे. जो मोजांग स्टुडिओजच्या २०११ च्या व्हिडिओ गेम माइनक्राफ्टवर आधारित आहे. त्याचे दिग्दर्शन जेरेड हेस यांनी केले आहे. चित्रपट अॅलिसन श्रोडर, बोमन आणि पामर यांच्यावर केंद्रित आहे. या चित्रपटात जेसन मोमोआ, जॅक ब्लॅक, डॅनियल ब्रूक्स, एम्मा मायर्स आणि सेबॅस्टियन हॅन्सन यांच्या भूमिका आहेत.
प्रेझन्स । थिएटर
हा एक भयपट आहे जो, एका कुटुंबाचे कथानक आहे. त्यांना जाणीव होते की ते राहत असलेल्या घरात ते एकटे नाहीत. स्टीव्हन सोडरबर्ग दिग्दर्शित या चित्रपटातील कलाकारांमध्ये लुसी लिऊ, ख्रिस सुलिव्हन आणि कॅलिना लिआंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.