खानापूर : मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना झाला विजेच्या तारेला स्पर्श; चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd April, 10:51 am
खानापूर : मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना झाला विजेच्या तारेला स्पर्श; चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू

पणजी : विटा तयार करण्यासाठी टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर खेळताना एका चिमूकलीचा हात हाय वोल्टेज तारेला लागल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना इदलहोंड, खानापूर येथील आहे. सदर घटना काल बुधवारी सायंकाळी ५.४५ दरम्यान घडली. यात मृत्यू पावलेल्या चिमूकलीचे नाव मनाली मारुती चोपडे (९) असे आहे. 

हाती आलेल्या माहितीनुसार, मारुती चोपडे यांच्या घरच्या बाजूलाच एका वीटभट्टी मालकाने विटा तयार करण्यासाठी माती साठवली आहे. या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा तयार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ढिगार्‍यावरूनच हेस्कॉम खात्याच्या  हाय वोल्टेज विद्युत तारा गेल्या आहेत. काल बुधवारी सायंकाळी ५.४५च्या सुमारास इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी मनाली व आसपासची चार लहान मुले खेळण्यासाठी मातीच्या ढिगार्‍यावर चढली होती. दरम्यान खेळत असताना तिचा तोल गेल्याने तिने जवळच असलेल्या विद्युत तारांना पकडले. विजेचा तीव्र झटका बसल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत  एक लहान मुलगादेखील जखमी झाला असून त्याच्यावर खानापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा वीटभट्टी मालकाची अक्षम्य चूक समोर आली. हेस्कॉम खात्याच्या लोकांनी वीटभट्टी मालकाला मातीचा ढीग हटविण्यास वारंवार सांगितले होते. परंतु सदर मालकाने निष्काळजीपणा दाखवत हा  ढिगारा काही हटवला नाही.  त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव नाहक गेला आहे. 

दरम्यान सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे. मृत्यू पावलेल्या मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आला असून आज गुरुवारी ३ एप्रिल रोजी सकाळी उतरीय तपासणीनंतर मुलीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. वीटभट्टी मालक घटना घडताच फरार झाला असल्याचे समजते.

हेही वाचा