यकृताच्या गंभीर व्याधीने होते त्रस्त
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेता मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार बऱ्याच काळापासून लिव्हर सिरोसिसने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २१ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ते बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते. देवाची कृपा आहे की शेवटच्या क्षणी त्यांना फारसा त्रास झाला नाही, त्यांनी शांततेने या जगाचा निरोप घेतला. त्यांचे अंतिम संस्कार उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील पवनहंस स्मशानभूमीत होतील, अशी माहिती त्याचे पुत्र कुणाल गोस्वामी यांनी माध्यमांना दिली.
मनोज कुमार विशेषतः त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जात होते. त्यांना भरत कुमार म्हणूनही ओळखले जात असे. उपकार, पूर्वा-पश्चिम, क्रांती, रोटी-कपडा और मकान हे त्यांचे यशस्वी चित्रपट होते. त्यांना ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार १९६८ मध्ये 'उपकार' चित्रपटासाठी मिळाला. 'उपकार' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा आणि सर्वोत्कृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनोज कुमार लहानपणापासूनच दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. मनोज कुमार यांना दिलीप साहेबांचा 'शबनम' (१९४९) हा चित्रपट इतका आवडला की त्यांनी तो अनेक वेळा पाहिला. चित्रपटात दिलीप कुमारचे नाव मनोज होते. जेव्हा मनोज कुमार चित्रपटांमध्ये आले तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव मनोज कुमार असे ठेवले.
लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरून त्यांनी उपकार हा चित्रपट बनवला
१९६५ मध्ये, मनोज कुमार हे देशभक्तीपर 'शहीद' या चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील 'ए वतन, ए वतन हमको तेरी कसम', 'सरफरोशी की तमन्ना' आणि 'मेरा रंग दे बसंती चोला' या गाण्यांना चांगलीच पसंती मिळाली.
लाल बहादूर शास्त्रींना हा चित्रपट खूप आवडला. शास्त्रीजींनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. शास्त्रीजींनी मनोजला या घोषणेवर चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मनोज कुमार यांनी 'उपकार' (१९६७) हा चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांना चित्रपट लेखन किंवा दिग्दर्शनाचा कोणताही अनुभव नव्हता.
एके दिवशी मनोज कुमार यांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी ट्रेनचे तिकीट काढले आणि ट्रेनमध्ये चढले. त्यांनी चित्रपटाची अर्थी पटकथा ट्रेनमध्ये बसून लिहिली आणि उर्वरित पटकथा तेथून परतताना लिहिली. या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सेकंड इनिंग सुरू केली. नंतर त्यांनी पुरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान यांसारखे देशभक्तीवर अनेक चित्रपट केले.