दुकाने सक्तीने बंद करण्याचे पोलिसांकडून निर्देश
म्हापसा : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (एनटीए) घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) बुधवार दि. २ एप्रिलपासून सुरू झाली असून या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील पणजी व म्हापसा केंद्राच्या परिसरातील सायबर कॅफे, झेरॉक्स व प्रिंटींग दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे.
देशातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (मेन) परीक्षा ही एक अभियांत्रिकी प्रवेश मूल्यांकन आहे. ही परीक्षा बुधवार दि. २, गुरूवार दि. ३, शुक्रवार दि. ४, सोमवार दि. ७ , मंगळवार दि. ८ व बुधवार दि. ९ या दिवशी होणार आहे.
उत्तर गोव्यात पणजीतील ईडीसी कॉम्प्लेक्स व म्हापसा येथील कॉपोटेम् सेंट्रो पेद्रो व्हिन्सेंट वाझ इमारतीमधील परीक्षा केंद्रामध्ये ही परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे या केंद्राच्या परिसरातील २०० ते ३०० मीटर अंतरावरील सायबर कॅफे, झेरॉक्स आणि प्रिंटरर्सची दुकाने सक्तीने बंद करण्याचे निर्देश पोलिसांकडून संबंधित दुकान मालकांना दिले आहेत.