दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निवाडा
मडगाव : राय येथे २४ मे २०२० मध्ये मूळ झारखंड येथील संशयित विवेकदेव सिंग याने मुकेश सिंग (३०) याचा खून केला होता. याप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा प्रधान न्यायालयाकडून संशयिताला दोषी ठरवलेले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी संशयित विवेकदेव सिंग याला सश्रम जन्मठेपेच्या शिक्षेसह एक लाखाचा दंड सुनावला. दंड न भरल्यास आणखी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलेडोंगर राय याठिकाणी आरोपी विवेकदेव सिंग हा कामगार म्हणून काम करत होता. त्यावेळी मुकेश सिंग व विवेकदेव हे भाड्याच्या खोलीत राहत होते. २४ मे २०२० रोजी मुकेश सिंग व विवेकदेव यांच्यात किरकोळ कारणावरून भांडत झाले.
या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले व रागाच्या भरात विवेकदेव सिंग याने कुर्हाडीने मुकेश सिंग याच्या डोक्यावर घाव घातला. यात मुकेश सिंग याचा मृत्यू झाला तर विवेकसिंग घटनास्थळावरुन पसार झाला होता.
मायना कुडतरी पोलिसांनी त्यांच्या खोलीत राहणार्या इतर कामगारांकडे चौकशी केल्यानंतर हा खून विवेकसिंग यानेच केल्याची खात्री पटल्यानंतर त्याचा शोध घेत राय चर्चनजीक विवेकसिंग याला अटक करण्यात आली.
खूनप्रकरणी गुन्हा नोंद करत संशयिताविरोधात आरोपपत्रही दाखल केलेले होते. त्यानुसार दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश शेरीन पॉल यांच्या न्यायालयाकडून १३ साक्षीदारांच्या साक्ष नोंद करून घेतल्यानंतर संशयित विवेकदेव सिंग याला दोषी ठरवण्यात आले होते.
जन्मठेपेसह एक लाखांचा दंड-
गुरुवारी न्यायालयाकडून संशयिताला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. जन्मठेपेसह आरोपीला एक लाखांचा दंड सुनावण्यात आला असून त्यातील ७५ हजार रुपये मृताच्या कुटुंबीयांना देण्यास सांगितले आहे. दंडाची रक्कम आरोपीने न भरल्यास त्याला आणखी तीन वर्षे कारावास भोगावा लागणार आहे.
शिक्षेचा कालावधी-
आरोपीने २५ मे २०२० ते ३ एप्रिल २०२५ पर्यंतचा कालावधी हा शिक्षेचा कालावधी मानला जाणार असल्याचेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. व्ही. जे कॉस्ता यांनी काम पाहिलेे. तर या प्रकरणाचा तपास मायणा कुडतरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी केले होते.