फ्लॅटसाठी पैसे घेत सात लाखांची फसवणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 12:47 am
फ्लॅटसाठी पैसे घेत सात लाखांची फसवणूक

मडगाव : फातोर्डा येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये फ्लॅट देण्याचे कबूल करत विक्री करार करण्यात आला. मात्र, संशयित सिद्धार्थ पडियार (रा. पारोडा, केपे) यांनी मकरा राम यांना फ्लॅट दिलेला नाही व त्यासाठी घेतलेले ७ लाखही परत न करता फसवणूक केली. याप्रकरणी पडियार यांच्याविरोधात फातोर्डा पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फातोर्डा येथील मकरा राम यांनी फातोर्डा पोलीस स्थानकात आर्थिक फसवणूकप्रकरणी तक्रार दाखल केली. २२ नोव्हेंबर २०२० ते २१ जून २०२१ या कालावधीत संशयित सिद्धार्थ पडियार यांनी आके येथील नोटरी सचिन कोलवाळकर यांच्या कार्यालयात फ्लॅट विक्रीसाठीची प्रतिज्ञापत्र पावती तयार केली, त्यानुसार फातोर्डा येथील प्रभाकर सहकारी गृहनिर्माण सोसायटीत फ्लॅट देण्याचे कबूल केले होते. मात्र, आतापर्यंत संशयित पडियार यांच्याकडून फ्लॅट देण्यात आलेला नाही तसेच फ्लॅटसाठी घेतलेले सात लाख रुपयेही परत देण्यात अपयश आले आहे. फ्लॅट देण्याचे कबूल करत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संशयित सिद्धार्थ पडियार याच्याविरोधात फातोर्डा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलीस उपनिरीक्षक रामराय नाईक पुढील तपास करत आहेत. 

हेही वाचा