पणजी : पणजीतील एक प्रसिद्ध हॉटेल आणि वारसा स्थळ असलेले हॉटेल मांडवी राज्यातील एक बँक ताब्यात घेणार आहे. कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्यामुळे हॉटेल मांडवीची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बँकेने बजावली आहे. यामुळे आता ऐतिहासिक मांडवी हॉटेल बँकेच्या ताब्यात जाण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
पोर्तुगीज काळातील मांडवी हॉटेल गेल्या तीन वर्षांपासून वादामुळे बंद आहे. रस्त्याच्या कडेला आणि पणजीतील एका मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या हॉटेलमध्ये पंतप्रधानांसह प्रमुख राजकीय नेते, देश-विदेशातील उद्योजक आणि कलाकारांनी वास्तव्य केले आहे. २०१० पर्यंत, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, परिषदा आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येत होते. बस स्टॉप, पोलीस मुख्यालय, जुने सचिवालय आणि इतर कार्यालये जवळ असल्याने हे हॉटेल इतर हॉटेल्सच्या तुलनेत सोयीस्कर होते. वरच्या मजल्यावरील कॉन्फरन्स रुममधून मांडवी नदीचे दृश्य दिसत होते. यामुळे हे हॉटेल देश-विदेशातील मान्यवरांसाठी एक विशेष आकर्षण बनले.
हे हॉटेल सध्या बंद आहे. हॉटेल मालकांनी गोवा अर्बन बँकेकडून कर्ज काढले होते. कर्ज न फेडल्याबद्दल बँकेने हॉटेलची मालमत्ता ताब्यात घेण्याची नोटीस बजावली आहे. कर्जदारांनी नोटीसला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. जिल्हाधिकाऱ्यांकडे बँक ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि देखरेखीखाली ही मालमत्ता ताब्यात घेतली जाईल, असे बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकबाकीमुळे बँकेने मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गुजरात लॉज होणार बंद
१८ जूनच्या रस्त्यालगत अनेक वर्षांपासून असलेले गुजरात लॉज हॉटेल देखील बंद केले जाईल. जमीन मालकाने लॉजच्या मालकाला जागा रिकामी करण्यास सांगितले आहे. हॉटेलमध्ये चहा, कचोरी, समोसा, गाजर हलवा आणि भेळ पुरी दिली जात होती.
राजकीय घडामोडींचे केंद्र
मांडवी हॉटेलचे बांधकाम १९५० साली सुरू झाले होते. १९५२ साली हॉटेलचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांनी बऱ्याचदा या हॉटेलात वास्तव्य केले आहे. सरकार स्थापन करण्यासह राजकीय बैठका तसेच राजकीय घडामोडींचे हे हॉटेल बरीच वर्षे एक प्रमुख केंद्र होते.