कामावर उशिरा आल्यामुळे प्रवेश नाकारला; अधिकाऱ्याची सुरक्षा रक्षकासोबत फ्री स्टाईल

सुरक्षा रक्षक जखमी : गोमेकाॅत उपचार, सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd April, 12:30 am
कामावर उशिरा आल्यामुळे प्रवेश नाकारला; अधिकाऱ्याची सुरक्षा रक्षकासोबत फ्री स्टाईल

पणजी : कामावर येण्यास उशीर झाल्यामुळे सुरक्षा रक्षकाने मच्छीमार खात्याच्या अधिकाऱ्याला प्रवेश देण्यास मनाई केली. यात दोघांमध्ये हाणामारी होऊन सुरक्षा रक्षक जखमी झाला. त्याच्यावर गोमेकाॅत उपचार सुरू आहेत. दरम्यान, अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी सुरक्षा रक्षक मोहन गारुडी (५८) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मच्छीमार खात्याचे अधिकारी हरीश प्रभू यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.१५ दरम्यान सुरक्षा रक्षक मोहन गारुडी याने तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे त्याच्या अनामिका बोटाला इजा झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेऊन पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विशांत महाले यांनी सुरक्षा रक्षक मोहन गारुडी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सदर अधिकारी उशीरा आल्यामुळे त्याला सुरक्षा रक्षकाने अडविल्याने दोघांत हाणामारी झाली. त्यात दोघे जखमी झाले. तर, सुरक्षा रक्षक मोहन गारुडी याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

हेही वाचा