जीसीएने क्रिकेटला महत्त्व द्यावे

क्रिकेटसाठी एक ध्येय ठेवून पुढील पाच वर्षांत गोव्यातील खेळाडू आयपीएलसह भारतीय संघात सहभागी होऊ शकतील, अशा पद्धतीने नियोजन करावे. जयस्वालमुळे गोव्यातील क्रिकेटमध्ये चैतन्य येईलच, पण गोव्यातील खेळाडू प्रगल्भ होतील, प्रभावी ठरतील यासाठी नव्या जोमाने जीसीएने काम करावे.

Story: संपादकीय |
03rd April, 12:49 am
जीसीएने क्रिकेटला महत्त्व द्यावे

गोव्यातील क्रिकेटपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली तरी चमकत नाहीत. आयपीएल सारख्या स्पर्धेत संधी मिळूनही पुढे येत नाहीत. गोव्यातील क्रिकेटला लागलेली घरघर संपता संपत नाही. काहीवेळा अनेक चांगले खेळाडू प्रादेशिक सामन्यांमधून पुढे येतात, रणजीत चमकतात, पण त्यांना पुढे संधी मिळत नाही. गोव्यातील खेळाडूंना अजूनही चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे, त्यासाठी यापुढे गोवा क्रिकेट संघटनेने प्रयत्न केले तर बऱ्यापैकी बदल होऊ शकतील. गेल्या अनेक वर्षांपासून गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान असावे यासाठी प्रयत्न होतात, पण ते मैदान कधीच उभे राहू शकले नाही. गोव्यातील क्रिकेटपटू घडवण्यासाठी आतापर्यंत झालेले सर्व प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत, असेच म्हणावे लागेल. कारण दर्जेदार खेळाडूच घडत नाहीत. गोव्यात ध्येयवादी खेळाडू आहेत. गावांपासून शहरांपर्यंत क्रिकेटचे वातावरण आहे, किंबहुना फुटबॉलपेक्षा क्रिकेटकडे गोव्यातील युवावर्ग जास्त आकर्षित आहे. असे असतानाही गोव्यातून क्रिकेटचे मोठे खेळाडू तयार होत नाहीत. जीसीएचे लक्ष सत्तेवर जास्त राहते त्यामुळे त्या नादात खेळाडूंच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. पण हल्ली काही बदल जीसीएमध्ये होऊ लागले. त्याचे श्रेय नक्कीच रोहन देसाई सारख्या पदाधिकाऱ्याला जायला हवे. आता जीसीएने गोव्याच्या रणजी संघासाठी जागतिक स्तरावर क्रमवारीत आघाडीवर असलेल्या यशस्वी जयस्वालला निवडले आहे. जयस्वाल मुंबई संघ सोडून गोव्यासाठी खेळू शकतो. गोव्याच्या संघाचा कर्णधार म्हणून त्याला जबाबदारी दिली जाईल. अर्जुन तेंडुलकरही रणजीसाठी गोव्याच्या संघात खेळत आहे. जयस्वाल गोव्याच्या संघात आल्यानंतर मोठे बदल दिसू शकतील. गोव्याचा संघही जयस्वालमुळे निश्चितच यापुढे चर्चेत राहू शकतो. जयस्वाल याचा गोव्याचा संघ मजबूत करण्यासाठी फायदा नक्कीच होईल.

यशस्वी जयस्वालने मुंबई संघ सोडून २०२५-२६ हंगामासाठी गोवा संघात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई क्रिकेट संघटनेला तसे कळवल्यामुळे गोव्यासाठी खेळण्याचे त्याचे निश्चित झाले आहे. आतापर्यंत जयस्वालचा खेळ हा आश्चर्यकारकच आहे. १९ कसोटी सामन्यांमध्ये सुमारे अठराशे धावा त्याने केल्या आहेत. शालेय क्रिकेट असो किंवा १९ वर्षांखालील भारतीय संघ किंवा युवा कसोटी क्रिकेटमध्ये असो, जयस्वालने केलेले विक्रम सहज मोडता येणार नाहीत असेच आहेत. म्हणून जयस्वालमुळे गोव्याच्या क्रिकेट संघाचा फायदा नक्कीच होईल आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे गोवा क्रिकेट संघ बरेच काही शिकू शकतो. गोव्यातील खेळाडूंमध्ये ध्येय आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील गुणांना पारखण्याचेही काम जीसीएने करायला हवे. चांगले प्रशिक्षक नेमण्यासह खेळाडूंना गोव्याबाहेर चांगल्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यावरही भर द्यावा. जीसीएकडे पैशांची कमतरता नाही. पण त्यांच्यातील मतभेदांमुळे खेळाडूंच्या भवितव्यावर परिणाम होऊ नये. गोव्यातून चांगले खेळाडू तयार व्हावेत यासाठी ज्या पद्धतीने जयस्वाल सारख्या खेळाडूला आणण्याची किमया जीसीएने साधली आहे, तशीच किमया गोव्यातील खेळाडूंना तयार करण्यासाठी साधावी.

​गोव्यातील क्रिकेटमध्ये सध्या प्रभावी असलेल्या खेळाडूत दर्शन मिशाळ, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, दीपराज गावकर, मोहीत रेडकर यांचा समावेश होतो. गेल्या काही आयपीएलमध्ये गोव्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खेळाडू खेळले. स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती, सौरभ बांदेकर, आदित्य आंगले, सुयश प्रभुदेसाई यांनी संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली. काही ठराविक आयपीएलनंतर ते लिलावातही आले नाहीत. गोव्यात असे क्रिकेटपटू तयार व्हायला हवेत जे भारतीय संघात निवडले जाऊ शकतात, आयपीएलसारख्या लिलावात जाऊ शकतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी जीसीएने गोव्यातील क्रिकेटच्या विकासासाठी उपाययोजना आखण्याची गरज आहे. कारण जीसीएने आपल्या अंतर्गत राजकारणावरच गेली दोन दशके घालवली. गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामनेही होण बंद झाले, त्यालाही जीसीएच कारणीभूत आहे. आता जीसीएमध्ये नव्या रक्ताला वाव मिळत आहे. नवे बदल होत आहेत. अंतर्गत मतभेदांना मूठमाती देऊन गोव्यातील क्रिकेट खेळाडूंच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे. क्रिकेटसाठी एक ध्येय ठेवून पुढील पाच वर्षांत गोव्यातील खेळाडू आयपीएलसह भारतीय संघात सहभागी होऊ शकतील, अशा पद्धतीने नियोजन करावे. जयस्वालमुळे गोव्यातील क्रिकेटमध्ये चैतन्य येईलच, पण गोव्यातील खेळाडू प्रगल्भ होतील, प्रभावी ठरतील यासाठी नव्या जोमाने जीसीएने काम करावे.