भूकंपानंतरचे म्यानमार

Story: अंतरंग |
01st April, 11:36 pm
भूकंपानंतरचे म्यानमार

थायलंड आणि म्यानमारमध्ये शुक्रवारी २८ मार्चला भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७.७ इतकी होती. म्यानमार आणि थायलंडमध्ये मदत आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे. बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत असून या दुर्घटनेनंतर सोमवारी सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.

२८ मार्च रोजी म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. हा २०० वर्षातील सर्वात मोठा भूकंप होता. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने मृतांचा आकडा १० हजारांपेक्षा जास्त असू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. सद्य स्थितीत म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या २ हजारांवर पोहोचली आहे. लष्कराच्या मते जखमींची संख्या ३९०० पेक्षा जास्त झाली असून २७० लोक अजूनही बेपत्ता आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ६ एप्रिलपर्यंत देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल, असे सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले. चिनी माध्यमे आणि पॅरिसच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ३ चिनी आणि २ फ्रेंच नागरिकांचा समावेश आहे. म्यानमारच्या बहुतेक भागात अजूनही संपर्क तुटलेला असल्याने नुकसानीचे पूर्ण प्रमाण अद्याप समजलेले नाही.

१७ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले म्यानमार हे देशातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. भूकंपग्रस्त भाग असलेल्या मंडाले या भागातील बहुतेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाल्यामुळे सलग तिसऱ्या रात्री बहुतेक लोकांनी रस्त्यावर रात्र काढली. दुर्घटनाग्रस्त भागासाठी भारतीय नौदलाच्या जहाजांनी आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री यांनी ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमधील यांगून बंदरात ३० टन मदत साहित्य पाठवले. याशिवाय, ११८ सदस्यांचे फील्ड हॉस्पिटल युनिट आग्राहून म्यानमारच्या मंडाले शहरात पोहोचले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.

भारतासह आंतरराष्ट्रीय बचाव पथक मदतीसाठी म्यानमारमध्ये पोहोचत आहेत. चीनकडून ८२ जणांचे बचाव पथक, हाँगकाँगकडून ५१ जणांचे पथक, मलेशियाने ५० जणांचे पथक पाठवण्याची घोषणा केली असून फिलिपिन्स, व्हिएतनाम, इंडोनेशिया, आयर्लंड, दक्षिण कोरिया, रशिया, न्यूझीलंड आणि अमेरिका यांनीही बचाव पथकं पाठवली आहेत. यूकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅम्मी यांनी 'गरजू नागरिकांच्या मदतीसाठी' १० दशलक्ष पाऊंडच्या मदतीची घोषणा केली आहे.

- गणेशप्रसाद गोगटे