पक्ष मजबुतीसाठी निर्णय घ्या : आताच सत्तेबाहेर काढून मंत्रिपद, महामंडळ भाजप आमदाराला देण्याचीही मागणी
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने शिवाय पुढील दोन वर्षे स्थिर सरकार राहणार असल्याचा ठाम विश्वास असल्यामुळे भाजपच्या कोअर समितीला मगोसोबतची युती नको आहे. मगोला मिळालेले एक मंत्रिपद आणि एक महामंडळ भाजपच्याच आमदारांना मिळाल्यास त्याचा पक्षाला अधिक फायदा मिळेल असे म्हणत, कोअर समितीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी मगोला आताच सत्तेबाहेर काढण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही दिवसांपूर्वी मांद्रेतील कार्यकर्ता मेळाव्यात, आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रेत भाजप उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. मांद्रे सध्या मगोकडे असताना आणि मगो सत्तेत असतानाही मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारचा ‘बॉम्ब’ टाकल्याने मगो नेत्यांत चलबिचल सुरू झाली. त्यानंतर काहीच दिवसांत मगो ज्या प्रियोळ मतदारसंघावर दावा करत आहे, तेथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी प्रियोळमध्येही भाजपचाच उमेदवार असेल असे जाहीर केले. ज्यांना हा निर्णय मान्य नसेल त्यांनी आताच चालते व्हावे, असा सल्लाही त्यांनी दिल्याने मगोच्या गोटात पुन्हा खळबळ माजली. त्यानंतर मंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर आणि अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तत्काळ दिल्ली गाठून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली.
भाजप-मगो युतीतील या कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या कोअर समितीच्या बैठकीतही हा विषय चर्चेला आला होता. त्यात काही पदाधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत सरकारला मगोची गरज नसल्याचे स्पष्ट करत, मगोला आताच सत्तेबाहेर काढण्याची मागणी केली. मगोच्या दोन आमदारांपैकी सुदिन ढवळीकर मंत्री आहेत, तर जीत आरोलकर यांच्याकडे गृहनिर्माण महामंडळ आहे. मगोला सत्तेबाहेर काढून हे मंत्रिपद आणि महामंडळ भाजपच्या इतर आमदारांना दिल्यास भविष्यात पक्षाला त्याचा अधिक फायदा मिळू शकतो, याचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी तत्काळ याबाबतचा निर्णय घ्यावा, असेही या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचवले आहे.
दरम्यान, भाजपने मगोच्या दोन्ही आमदारांना न्याय दिला. आलेक्स रेजिनाल्ड, डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि आंतोन वाझ या तिन्ही अपक्ष आमदारांना महामंडळे दिली. परंतु, भाजप आमदार असलेले दिगंबर कामत, मायकल लोबो, संकल्प आमोणकर यांची वर्णी कुठेही लावलेली नाही. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. याचाही सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी स्पष्ट भूमिकाही या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासमोर मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपातही ‘घरभेदी’
भाजपातीलच काहीजण मगोच्या नेत्यांना फूस लावत आहेत. यातून पक्षात दोन गट पडत असल्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या लक्षात आले आहे. अशा नेत्यांवर भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष केंद्रित केले असून, त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते, असेही सूत्रांनी नमूद केले.