जागावाटपाचा निर्णय सर्व्हेनंतर होणार असल्याचेही केले स्पष्ट
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : भाजप-मगो युतीत सर्व काही आलबेल आहे. २०२७ ची विधानसभा निवडणूक आम्ही युतीनेच लढवू. दोन्ही पक्षांच्या सर्व्हेनंतर जागांचे वाटप होईल, असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रियोळमध्ये केलेले वक्तव्य आणि त्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांनी सुरू केलेल्या टीकांनंतर ढवळीकर बंधूंनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांच्याशी युतीसंदर्भात चर्चा केली. भाजप-मगो युती पुढील दोन वर्षे कायम राहील, अशी हमी केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला दिली आहे. त्यानुसार आम्ही काम करत राहू. भाजप आणि मगो हे दोन्ही पक्ष समविचारी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष युती करूनच लढतील, असे दीपक ढवळीकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत जागांचे वाटप दोन्ही पक्षांकडून होणाऱ्या सर्व्हेनंतर होईल. भाजप मोठा पक्ष असून, त्यांचा सर्व्हेही बिनचूक असतो. त्यामुळे भाजपचा सर्व्हे आल्यानंतर कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाईल हे निश्चित होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कोणीतरी दिशाभूल केली असावी. त्यामुळेच त्यांनी युतीबाबत विधाने केली असावी, असेही त्यांनी नमूद केले.
माझी दिशाभूल कोण करेल ? : मुख्यमंत्री
मगोेचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी ‘दिशाभूली’संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता, माझी दिशाभूल कोण करेल ?, इतकेच म्हणत त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले. राजकीय वर्तुळात पुन्हा संभ्रम पसरला आहे.