मंत्रिमंडळ फेरबदल, भाजप-मगो युतीबाबत होणार सखोल चर्चा
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : संसद अधिवेशनाची सांगता ४ एप्रिलला होत असल्याने, राज्य मंत्रिमंडळ फेरबदल आणि भाजप-मगो युतीसंदर्भातील पुढील चर्चांसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक ५ एप्रिलनंतर दिल्लीला जाणार आहेत, अशी माहिती भाजपातील सूत्रांनी बुधवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी मांद्रे आणि प्रियोळमध्ये केलेल्या वक्तव्यांमुळे युतीचा विचार करून मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री आणि दामू नाईक यांनी गेल्या काही दिवसांत दिल्ली दौरे करून केवळ मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली होती; परंतु आता युतीचा विषय ऐरणीवर आला असल्याने युती टिकवायची की आताच तोडायची हे लक्षात घेऊनच मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय होणार आहे. संसद अधिवेशनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर काही नेत्यांशी मुख्यमंत्री आणि दामू नाईक यांची याबाबत सखोल चर्चा झाली नाही. संसद अधिवेशन संपताच हे दोन्ही नेते दिल्लीत जाऊन मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळात फेरबदल होतील, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, मंत्रिमंडळात फेरबदल करत असताना ज्या मंत्र्यांकडे वजनदार खाती आहेत, त्यांच्याकडील काही खाती नव्याने मंत्रिमंडळात दाखल होणाऱ्या मंत्र्यांकडे देण्याचा विचार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. पण, त्याला काही मंत्र्यांनी आक्षेप घेतल्याने याबाबतही मुख्यमंत्री पुढील बैठकीत वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.