तीन वर्षांत १३७ इलेक्ट्रिक वाहनांना अपघात; ११ मृत्यू

राज्यसभेतील लेखी उत्तरातून स्पष्ट


03rd April, 12:35 am
तीन वर्षांत १३७ इलेक्ट्रिक वाहनांना अपघात; ११ मृत्यू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या तीन वर्षांत राज्यातील रस्ते अपघातांत एकूण १३७ इलेक्ट्रिक वाहने सापडली असून, त्यात इलेक्ट्रिक वाहने असलेल्या ११ जणांचा मृत्यू झाला. तर, १०७ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती राज्यसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून समोर आली आहे.
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक लोकांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावी, यासाठी अशा वाहनांच्या खरेदीवर सरकारने अनुदानही दिले होते. त्यामुळे तीन-चार वर्षांपासून नागरिकांचा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशी वाहनेही अपघातांत सापडत असून, गेल्या तीन वर्षांत १३७ वाहने अपघातांत सापडली. त्यात ११ जणांचे बळी गेले, तर १०७ जण जखमी झाल्याचे केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री भूपतीराजू वर्मा यांनी राज्यसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या नऊ हजारांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहने आहेत. मध्यंतरीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दिसून आलेल्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम म्हणून राज्यात अशा वाहनांच्या नोंदणीत घट झाली आहे. २०२२ मध्ये अशा ५,६८३ वाहनांची नोंदणी झाली होती. २०२३ मध्ये त्यात वाढ होऊन ही संख्या ९,४८२ झाली. परंतु, २०२४ मध्ये हा आकडा कमी होऊन ९,०२६ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली होती.

हेही वाचा