बार्देशः म्हापशात कचरा टाकणाऱ्या ४० जणांवर पालिकेची कारवाई

घन कचरा, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त मोहीम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18 hours ago
बार्देशः म्हापशात कचरा टाकणाऱ्या ४० जणांवर पालिकेची कारवाई

म्हापसा : येथील शहरातील ब्लॅक स्पॉटवर कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई तसेच जागृतीच्या उद्देशाने म्हापसा पालिकेने गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत बुधवारी व गुरूवारी सुमारे ४० जणांवर कारवाई करण्यात आली.

म्हापसा शहारत सध्या कचरा व्यवस्थापनाची गंभीर समस्या बनली आहे. आसगाव पठारावरील जागेवर कचरा टाकण्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील ब्लॅक स्पॉटवरच घरोघरी गोळा होणारा कचऱ्याचे वर्गीकरण पालिकेला करावे लागते.

त्यातच या ब्लॅक स्पॉटवर मोठ्या प्रमाणात शेजारी भागातील लोक कचरा आणून टाकत असल्याने या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे.

या समस्येबाबत अनेकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे वरील सरकारी यंत्रणेच्या सहाय्याने उघड्यावर कचरा टाकण्याच्या या उपद्रवाला आळा घालण्यासाठी पालिकेने बुधवारी २ एप्रिल पासून विशेष मोहीम राबवली आहे.
नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या नेतृत्वाखाली या पथकामध्ये पालिका अभियंता प्रशांत नार्वेकर, पालिका निरीक्षक नरसिंह राटवळ, पर्यवेक्षक सुनिल नाईक, गोवा घन कचरा व्यवस्थापन मंडळाचे अधिकारी धीरज चोडणकर, नंदेश नाटेकर, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सिद्धांत देसाई यांचा समावेश होता.

२५ जणांविरोधात कारवाई
बुधवारी सकाळी व रात्री काणका बांध, मरड, खोर्ली सीम व जुने आझिलो इस्पितळ या ठिकाणी असलेल्या ब्लॅक स्पॉटवर घन कचरा, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसह नगरपालिका पथकाने म्हापसा पोलिसांच्या मदतीने कारवाई मोहीम राबवली. यावेळी या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्या २५ जणांना या पथकाने पकडले व त्यांच्याकडून कचरा व्यवस्थापन कायद्यान्वये प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे दंड वसूल केला.

मोहीम बंद होताच पुन्हा कचऱ्याच्या राशी
डिसेंबर २०२२ मध्ये पालिकेने अशाच प्रकारे ब्लॅक स्पॉटवर कचरा टाकणाऱ्या लोकांविरुद्ध मोहीम राबवली होती. यातून पालिकेने लाखो रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केली होती. या मोहिमेची काही दिवस पंचायत क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. मात्र ही मोहीम बंद झाल्यानंतर पुन्हा म्हापशात कचरा टाकण्याची प्रथा सुरू झाली.                            

हेही वाचा