म्हापशातील अलंकार थिएटर परिसरातील ९ फास्टफूड स्टॉलचा समावेश
म्हापसा : अन्न व औषधे प्रशासनाने म्हापशातील जुना बाजारसह हणजूण व सांगोल्डा येथे छापा टाकून रेस्टॉरन्ट व फास्टफूड स्टॉल मिळून एकूण १९ आस्थापने बंद केली. ही आस्थापने अस्वच्छ तसेच असुरक्षित असे खाद्यपदार्थ बनवत होती.
एफडीएच्या पथकाने मंगळवार, दि. १ रोजी रात्री सांगोल्डा व हणजूण मधील एकूण २० रेस्टॉरन्टची पाहणी केली. त्यातील ९ रेस्टॉरन्ट अनुपालन अहवाल सादर होईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यात प्रसिद्ध राजस्थानी रेस्टॉरन्टसह स्थानिक रेस्टॉरन्ट आणि कॅफेचा देखील समावेश आहे.
बुधवारी २ रोजी एफडीएच्या पथकाने म्हापशातील अलंकार थिएटर (जुना बाजार) आणि आंगड भागातील फास्टफूड स्टॉल व रेस्टॉरन्टची पाहणी केली. यातील ९ फास्टफूड स्टॉल व १ रेस्टॉरन्ट मिळून १० आस्थापने बंद करण्याचे निर्देश प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच अनुपालन अहवाल सादर करण्याची सूचना केली.
ही फास्टफूड स्टॉल व रेस्टॉरन्ट अस्वच्छ अशा स्थितीत सुरू होती. तसेच फास्टफूड स्टॉलमधील पदार्थांमध्ये आरोग्यास हानीकारक असा रंग वापरला जात होता.
अन्न व औषधे प्रशासनाच्या संचालक स्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर गोवा अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, राजाराम पाटील, लेनीन डिसा, अमित मांद्रेकर व इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
एफडीएने जानेवारीतही केली होती कारवाई
एफडीएने यापूर्वी अलंकार थिटएर परिसरातील फास्टफूडवाल्यांना स्वच्छता तसेच इतर नियमांचे पालन करण्याची सूचना केली होती. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या जानेवारीमध्ये प्रदूषणाच्या कारणावरून काही फास्टफूड सील केली होती. नंतर हे फास्टफूड पूर्ववत सुरू झाले.