बिघडलेल्या ट्रकजवळ थांबलेल्या चालकाला कारने उड​वले

बांबोळीत अपघात : जखमी कारचालक इस्पितळात दाखल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
02nd April, 12:19 am
बिघडलेल्या ट्रकजवळ थांबलेल्या चालकाला कारने उड​वले

पणजी : बांबोळी येथील नवीन नियाझ रेस्टॉरंट जवळ बिघडलेल्या ट्रकजवळ थांबलेल्या चालक सुरेंद्र बिश्नोई (४४) याला भरधाव कारने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी कार चालक आकाश निदोनी (२३) याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई केली.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी जुने गोवा पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक विष्णू शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सोमवारी मध्यरात्री २ वाजता बांबोळी येथील नवीन नियाझ रेस्टॉरंट जवळ ट्रक बिघडलेला होता. त्यामुळे ट्रकचा चालक सुरेंद्र बिश्नोई (४४) खाली उतरून ट्रकजवळ थांबला होता. याच दरम्यान पणजीहून मडगावच्या दिशेने आकाश निदोनी (२३) हा कार घेऊन जात होता. कारवरचा ताबा याठिकाणी सुटल्याने कारने ट्रक चालक बिश्नोई याला जोरदार धडक दिली. त्यात बिश्नोई गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर, अपघातात जखमी झालेल्या कार चालक आकाश निदोनी यालाही इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघाताची माहिती मिळताच जुने गोवा पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक विष्णू शिंदे व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार पालकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. उपनिरीक्षक जसविता नाईक यांनी कार चालक आकाश निदोनी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. 

हेही वाचा