विनाकारण गाजलेली मोदींची नागपूर भेट

संघ हा भाजपचा वैचारिक मार्गदर्शक आहे, हे लपून राहिलेले नाही. अनेक नेत्यांनी आपली कारकीर्द घडविण्याचे श्रेय संघाला दिले असले, तरी संघाने आपल्या कारभारावर किंवा राजकीय अजेंड्यावर प्रभाव टाकला नाही किंवा पक्ष चालवला नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Story: विचारचक्र |
03rd April, 12:47 am
विनाकारण गाजलेली मोदींची नागपूर भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याला नागपूरला भेट दिली. महत्त्वाच्या एका प्रकल्पाची पायाभरणी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट असे कार्यक्रम जाहीर झाले होते. त्यानुसार मोदी यांचा नागपूर दौरा पार पडला. पंतप्रधान एका संघटनेच्या शताब्दी वर्षात मुख्यालयाला भेट देतात, यात खरे तर काहीच वावगे नव्हते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याप्रमाणेच माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनीही नागपूरला यापूर्वी अनेकवेळा भेट दिली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले यात काहीच आक्षेपार्ह असू शकत नाही. २००० साली स्व. वाजपेयी यांनी नागपूरला भेट दिली होती. मग आताच मोदी यांच्या भेटीचा विनाकारण गवगवा का केला जात आहे, यापेक्षा ही भेट राजकीय पातळीवर का गाजविली जात आहे, हे एक कोडेच म्हणावे लागेल. एखादी व्यक्ती काही वर्षांनी आपल्या कुटुंबाला भेटली तर तो कौतुकाचा विषय ठरू शकतो, वादाचा नव्हे. नरेंद्र मोदी यांनी संघाचे प्रचारक म्हणून देशभरात केलेला प्रवास, नंतर त्यांचा गुजरातमध्ये झालेला राजकारण प्रवेश या बाबी लक्षात घेतल्या तर ते काही कालावधीनंतर मूळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटले, तर त्यात नवल ते काय असेच कोणीही म्हणेल. हे झाले सामान्य माणसाचे मत. राजकारणातील प्रत्येक घटनेचे अन्वयार्थ लावणारे पंडित आपल्या देशात अनेक आहेत, त्यामुळे मोदी यांची सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी झालेली चर्चा म्हणजे काही तरी अजेंडा ठरला असेल, त्याची कार्यवाही कशी करावी याचा आराखडा तयार केला गेला असेल असेच बहुतेक राजकीय निरीक्षकांना वाटते. असे वाटण्यालाही कारण आहे.

संघ हा भाजपचा वैचारिक मार्गदर्शक आहे, हे लपून राहिलेले नाही. मात्र, यापूर्वी माजी पंतप्रधान आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सावधगिरी बाळगून सरकार आणि संघ यांच्यात फरक केला आहे. अनेक नेत्यांनी आपली कारकीर्द घडविण्याचे श्रेय संघाला दिले असले, तरी संघाने आपल्या कारभारावर किंवा राजकीय अजेंड्यावर प्रभाव टाकला नाही किंवा पक्ष चालवला नाही, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्ष आणि संघ यांच्यातील अस्वस्थतेच्या बातम्यांमुळे गेल्या वर्षीच्या निवडणुकीत भाजपने लोकसभेचे संख्याबळ बहुमताच्या आकड्यापेक्षा खाली आणल्यानंतर नऊ महिन्यांनी पंतप्रधानांचा हा दौरा होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप स्वयंपूर्ण असल्याचे संकेत देत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले होते की, पक्षवाढीला संघाची गरज होती, आता भाजप सक्षम आहे आणि स्वतःचा कारभार चालवतो. या वक्तव्यामुळे संघ नाराज असल्याचे मानले जात होते.

लोकसभेतील पराभवानंतर भाजपने संघाशी संपर्क साधून हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. २०१४ नंतरच्या मोदी ब्रँडच्या राजकारणाचा एक भाग म्हणून 'मोदीत्वाच्या मुद्द्यावर' सलग निवडणुका लढविणाऱ्या भाजपच्या व्यक्तिमत्वाधारित राजकारणाला संस्थात्मक स्वरूप देण्यावर संघाचा भर होता. मोदींच्या नेतृत्वात दिसणारा भाजपमधील व्यक्तिमत्व प्रभाव आरएसएसला कधीच आवडला नाही. मोहन भागवत यांनी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्व वर्चस्वावर संघटनेची नाराजी दर्शविणारी विधाने केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र भाजप आणि संघ एकत्र काम करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. फेब्रुवारीत दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात बोलताना मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रउभारणीच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. संघामुळेच मराठी भाषा आणि संस्कृतीशी जोडले जाण्याचे भाग्य लाभले, असेही ते म्हणाले. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला लेक्स फ्रिडमॅन पॉडकास्टवर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद यांची शिकवण आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा-प्रेरित तत्वज्ञानाने त्यांना सतत प्रेरणा दिली आहे.

मोदी यांनी मोहन भागवत यांच्यासमवेत आधी हेडगेवार स्मृती मंदिरात आणि नंतर माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरमध्ये व्यासपीठावर एकत्र येणे हे देखील भाजप आणि संघ यांच्यातील जवळीकीचे द्योतक मानले जाते. याआधी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात राम मंदिराच्या अभिषेकावेळी दोघे एकत्र आले होते. संघाचा शताब्दी सोहळा आणि बेंगळुरूमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांपूर्वी पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्याकडे दोन्ही संघटनांमधील संबंध सुधारण्याचे लक्षण मानले जात आहे, अशा वेळी भाजप पुढील महिन्यात बेंगळुरूच्या बैठकीत आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी संघाचा उल्लेख संपर्पण आणि सेवा या सर्वोच्च तत्त्वांचे पालन करणारी संघटना म्हणून केला आहे, हे देखील राष्ट्र उभारणी आणि विकासामध्ये संघाची रचनात्मक भूमिका अधोरेखित करून २०४७ च्या विकसित भारत योजनांमध्ये संघाच्या भूमिकेला मान्यता देण्याचा आणि वैध करण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. संघाशी संबंधित अनेक संघटना देशभरात सामाजिक कार्यासाठी काम करत असल्या तरी विरोधक त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात आणि अनेकदा त्यांच्यावर छुपा अजेंडा पसरवण्याचा आरोप केला जातो. उदाहरणार्थ, राम मंदिर आणि कलम ३७० रद्द करण्याचा आग्रह. आधीच्या एनडीए सरकारच्या काळात मागे पडलेले हे मुद्दे तडीस गेले. यामुळे ही संघटना मुस्लिमविरोधी असल्याचा समज देखील पसरला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात स्वयंसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्रेय मोदींनी दिल्याने संघाचे काही मुख्य मुद्दे भाजपच्या राजकारणात पुन्हा आघाडीवर येत असल्याचे लक्षण मानले जात आहे आणि संघाने राबविलेल्या सामाजिक उपक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर घातलेली बंदी उठविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही बाब निश्चित झाली आहे.

शिवसेना (उबाठा)चे बोलके प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी यांनी सरसंघचालकांची भेट घेऊन निवृत्तीपत्र दिल्याचा शोध लावला आहे. आपला उत्तराधिकारी निवडावा असेही मोदी यांनी सांगितल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. मराठीत ज्याला पुडी सोडणे म्हणतात, तसा हा बातमी पसरवण्याचा प्रयत्न मानला जातो. अन्य पक्षांतील घडामोडीविषयीच राऊत अधिक बोलतात, आपल्या पक्षाबद्दल कधी काही सांगत नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्या अनुषंगाने राऊत यांच्या मताची दखल कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. मोदींची निवृत्ती अथवा नवा भाजप अध्यक्ष हा संघाशी चर्चा करून ठरवला गेला, तर त्यात कोणाला आश्चर्य वाटणार नाही, असे या दोन्ही संघटनांचे परस्पर संबंध आहेत. त्याचा बाऊ करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत, हेच खरे.


गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४