धोनी ठरतोय टीकेचा धनी !

Story: क्रीडारंग |
31st March, 09:33 pm
धोनी ठरतोय टीकेचा धनी !

चेन्नई सुपर​किंग्सला लागोपाठ दोन सामन्यामंध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना पराभव पत्करावा लागल्याने महेंद्रसिंग धोनी टीकेचा धनी ठरत आहे. 

पूर्वी ‘अनहोनी को होनी कर दे धोनी’ असे म्हटले जायचे. धोनी मैदानात असला की, कितीही मोठे लक्ष्य असो, तो निश्चित पार करेल, असा विश्वास क्रिकेटप्रेमींना असायचा. पण आता धोनीच्या खेळावर त्याचे वय प्रभाव पाडत आहे. याची जाणीव कदाचित त्यालाही असावी, म्हणून तो मोक्याच्यावेळी खालच्या नंंबरवर फलंंदाजी करण्यासाठी येतो. मात्र याचा फटका आता संघाला बसताना दिसत आहे. संघाचा विजय महत्त्वाचा की खेळाडू याचा विचार करण्याची वेळ सध्या सीएसके व्यवस्थापनावर आलेली आहे.

धोनीच्या बाबतीत नेहमी म्हटले जाते, की दबावाखाली त्याची कामगिरी सर्वोच्च स्तरावर पोहोचते. परंतु गेल्या काही हंगामापासून आयपीएलमध्ये फिनिशर म्हणून त्याची कामगिरी तितकीशी चांगली झालेली नाही. गेल्या तीन हंगामांपासून तो फिनिशर म्हणून आपली भूमिका योग्यरित्या पार पाडताना दिसत नाही. 

आयपीएल २०२३ पासून सीएसकेने जिंकलेल्या १८ सामन्यांमध्ये धोनीने फक्त तीन सामन्यांमध्ये धावा केल्या आहेत. याउलट, सुपर किंग्जने गमावलेल्या १४ सामन्यांमध्ये धोनीने ८३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये विशाखापट्टणममध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध नाबाद ३७ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ३० मार्च रोजी धोनीचा आणखी एक डाव संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरला. राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीने ११ चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १६ धावा केल्या. गुवाहाटीतील बरसापारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सहा धावांनी पराभव झाला. शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी २० धावांची आवश्यकता होती. संदीप शर्माने सुरुवातीला वाइड बॉल टाकला पण पुढच्याच चेंडूवर धोनीला बाद केले. धोनीने चेंडू ऑन-साईडवरून स्वीप केला, पण शिमरॉन हेटमायरने त्याचा अप्रतिम झेल घेतला. धोनी बाद झाल्यानंतर सीएसकेची घसरगुंडी उडाली आणि त्यांचा डाव सहा बाद १७६ धावांवर संपला. त्याआधी आरसीबीसोबतच्या सामन्यातही धोनीला विजयश्री खेचून आणण्यात अपयश आले आणि सीएसकेने हा सामना ५० धावांनी गमावला.

केवळ संघाच्या प्रसिद्धीसाठी धोनीला संघात स्थान देण्यात आल्याचा सूर आता जोर धरू लागला आहे. धोनीने आता मेन्टॉरची भूमिका बजावून आपल्या जागी एखाद्या नवख्या खेळाडूला स्थान द्यावे, असेही त्याचे फॅन्स आणि क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत. धोनी यष्टीच्या मागे अप्रतिम कामगिरी बजावत आहे. परंतु फलंदाजी करताना संघाला विजयापर्यंत नेण्यास तो कमी पडताना दिसत आहे.


-प्रवीण साठे, दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत