भाजपमध्ये दाखल झालेल्या बाटग्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका, अशी मागणी जोर धरत असली तरी मुख्यमंत्री नेमकी कोणत्या निकषावर नव्या मंत्र्यांची निवड करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यास डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच सहा वर्षे पूर्ण केली. डॉ. प्रमोद सावंत यांचे राजकीय गुरू स्व. मनोहर पर्रीकर यांना जे जमले नाही, ते त्यांनी साध्य केले आहे. स्व. मनोहर पर्रीकर एक दोनदा नव्हे तर चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री झाले, पण सलग एखादी टर्म वा पाच वर्षे या पदावर राहण्याची वा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना नियतीने दिली नाही. डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर मात्र नियती बरीच उदार झालेली दिसते. प्रतिकूल अशा परिस्थितीत वादळात सापडलेल्या जहाजाचे कप्तानपद स्वीकारल्यानंतर अनेक वादळांना तोंड देत ती नौका सुखरूप किनाऱ्याला लावणे हे काम तसे निश्चितच सोपे नव्हते. डॉ. प्रमोद सावंत यांनी ते काम तर केलेच, पण आज सहा वर्षे या जहाजाच्या कप्तानपदावर सलग राहूनही त्यांनी त्यावर अशी काही मांड ठोकली आहे की अजून काही वर्षे किंवा राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीपर्यंत निदान त्यांना तेथून हलवायचे झाले तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वास त्यावर बराच विचार करावा लागेल. आपल्याला केंद्रात जायची अजिबात इच्छा नाही असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अलीकडेच कुठे तरी बोलताना म्हटल्याचे आठवते. आता त्यांनी केंद्रात जावे की नको, हे त्यांच्या इच्छेवर थोडेच अवलंबून असेल, कारण अशावेळी 'आले नेतृत्वाच्या मना तेथे कुणाचेही चालेना' हाच नियम लागू ठरतो. त्यांचे राजकीय गुरू मनोहर पर्रीकर यांनीही केंद्रात न जाण्यासाठी लाख प्रयत्न केले याचे आम्ही साक्षीदार आहोत, त्यांनाही अखेर त्यांच्या इच्छेविरुद्धच दिल्लीला जावे लागले, हा इतिहास तसा बराच ताजा आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिल्लीचे बोलावणे येईल अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे असेही मी म्हणणार नाही, याचे कारण म्हणजे त्यांनी मागील सहा वर्षांत या प्रदेशाला चांगले नेतृत्व देताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा जो विश्वास संपादन केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तब्बल सहा वर्षे सलग मुख्यमंत्रिपदावर राहिल्याने एक नवीच ऊर्जा आजकाल डॉ. प्रमोद सावंत यांच्या कामात दिसू लागली आहे. त्यातच अत्यंत उत्साही आणि कार्यकर्त्यांमधूनच प्रदेश अध्यक्षपदापर्यंत पोचलेले सळसळत्या रक्ताचे दामू नाईक यांची साथ त्यांना मिळाली आहे. डॉ. प्रमोद सावंत आणि दामू नाईक ही जोडी गोव्याच्या राजकारणात पुढील काही वर्षात भारतीय जनता पक्षाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम करील असे सध्याचा त्यांचा कामाचा झपाटा पाहता म्हणता येईल. राज्य विधानसभा निवडणुका तसे पाहता अजून किमान दोन वर्षे दूर आहेत. कदाचित चार वर्षेही पुढे जाऊ शकतील, पण या दुकलीचा चालू असलेला कामाचा झपाटा पाहिला तर निवडणुका अगदी जवळ तर आल्या नाहीत ना, असा प्रश्न अनेकांना पडावा पण तसे काहीही नाही ही वस्तुस्थिती आहे. दामू नाईक प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे जे आयोजन चालले आहे त्यातून एकच गोष्ट ठळकपणे दिसून येते ती म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना कसलीही संधी न देण्याचा चंग या दुकलीने बांधलेला दिसतो.
काल परवाच फोंडा तालुक्यातील प्रियोळ मतदारसंघात पार पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सडेतोडपणे जे विधान केले त्यास दाद द्यावीच लागेल. पक्ष नेतृत्वाचा वरदहस्त माथ्यावर असल्याशिवाय कुणीही नेता मग तो मुख्यमंत्रिपदावर का असेना असे विधान करणार नाही हे मान्य करावेच लागेल. प्रियोळसारख्या मतदारसंघातच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला खडसावणे ही तशी सोपी गोष्ट मुळीच नव्हती, पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी या मेळाव्यातून जो संदेश दिला त्याची दखल मगोच्या बरोबरीने विरोधी पक्षानाही घ्यावी लागणार आहे. असे काय म्हणाले मुख्यमंत्री या मेळाव्यात हे जाणून घ्यायचे असेल तर भाजपच्या मार्गात आडवे न येण्याची ताकीद सरकारात जोडीदार असलेल्या मगो नेतृत्वास त्यांनी दिली तर आहेच पण त्याचबरोबर प्रियोळ आणि मांद्रे मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा विचार करू नका, हे दोन्हीही भाजपचे मतदारसंघ असल्याचेही खडसावून सांगितले आहे. भाजपशी युती हवी की नको हे आताच मगो पक्षाने सांगावे, असा इशारा देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नेमका कोणता संदेश ढवळीकर बंधूंना दिला यावरही आता चर्चा सुरू होणे स्वाभाविकच आहे. राज्यात भाजपची ताकद आता एवढी वाढली आहे की त्यांना यापुढे टेकूची गरज नाही असा संदेश त्यानी मगो नेतृत्वास दिलाय की आताच काय ते स्पष्टपणे सांगून मंत्रिमंडळ फेररचनेसाठी आपली वाट मोकळी करा असे तर मुख्यमंत्र्यांना सांगायचे नाही ना, असेही अनेकांना वाटू शकते.
दिल्ली जिंकल्यानंतर बिहारही जिंकण्यास निघालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे गोव्याकडेही तेवढेच जवळून लक्ष आहे हे यातून स्पष्ट आहे. गोव्यात विरोधी पक्षाची हालत भाजपने किंबहुना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बरीच नाजुक करून ठेवली आहे. काँग्रेस, आम आदमी, गोवा फॉरवर्ड , आरजी हे पक्ष येत्या निवडणुकीत एकमेकांचेच पाय कसे ओढतील व आपला विजयाचा मार्ग कसा साफ होईल याकडे लक्ष देतच भाजप गणिते मांडत आहे. त्याबरहुकूमच डॉ. सावंत आणि दामू नाईक ही दुकली कामाला लागलेली सध्या स्पष्ट दिसत आहे. त्यात भर म्हणून हे नवीन पिल्लूही त्यांनी प्रियोळमध्ये सोडून दिले असून त्यातून प्रतिक्रिया नेमकी काय उमटते याचा अंदाज त्यांना घ्यायचा आहे आणि त्यानंतरच निर्णयावर शिक्कामोर्तब करणे हा एकूण धोरणाचा भाग दिसतो. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासाठी हे सारे अनपेक्षित असल्याने त्यांच्या गोटात खळबळ माजणे स्वाभाविकच आहे. मगो पक्षाला कोंडीत गाठण्याने काही राजकीय लाभ अपेक्षित आहेत. मगोने सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास भाजपचे काम अधिकच सोपे होईल आणि न घेतला तरीही भवितव्यासाठी ते चांगलेच ठरेल. एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा भाजपचा हा यत्न असून विरोधकांना शिरजोर होऊ न देणे, हाच यामागील उद्देश आहे. मंत्रिमंडळ फेररचना तर अगदी तोंडावर असल्याने गोविंद गावडेंना हत्तीचे बळ देत आश्वस्त करण्याचाही हा प्रकार असू शकतो, असेही काही राजकीय जाणकारांना वाटते. भाजपमध्ये दाखल झालेल्या बाटग्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका, अशी मागणी जोर धरत असली तरी मुख्यमंत्री नेमकी कोणत्या निकषावर नव्या मंत्र्यांची निवड करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
- वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९