दिल्ली सायबर गुन्हे पोलिसांच्या सहकार्याने म्हापसा पोलिसांची कारवाई
म्हापसा : हनीट्रॅप प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आणि मुंबई विमानतळावरून पोलिसांच्या तावडीतून पसार झालेला इमाद वसीम खान (३२ रा. उत्तरप्रदेश) याला म्हापसा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या सहाय्याने डेहराडूनमधून अटक केली. संशयित आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. संशयित गेल्या १९ जून २०२४ रोजी पसार झाला होता.
नार्कोटिक ब्यूरोचे अधिकारी असल्याचे भासवून म्हापसास्थित दिल्लीतील एका व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून ३० लाख रुपये खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात संशयित इमाद खान चहा मास्टरमाईंड होता. संशयिताने फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मुंबई विमानतळावरून पलायन केले होते. यापूर्वी या प्रकरणात पोलिसांनी निवेदिता शर्मा (उत्तर प्रदेश), भूवन अरोरा (उत्तराखंड), फैजान खान (उत्तर प्रदेश), मोहम्मद बसित (उत्तर प्रदेश) व यासर खान (उत्तर प्रदेश) यांना अटक केली होती. हे पाचही संशयित सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.
संशयित आरोपी इमाद खान हा पसार झाल्यापासून म्हापसा पोलीस त्याच्या हालचालीवर पाळत ठेवून होते. विविध मार्गांनी सखोल तपास चालू असताना इमाद हा डेहराडून येथे असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाशी म्हापसा पोलिसांनी समन्वय साधला व त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. नंतर दोन्ही पोलिसांनी सापळा रचून संशयिताला शनिवारी २८ मार्च रोजी अटक केली. संशयिताला गोव्यात आणून पोलिसांनी रितसर अटक केल्यावर म्हापसा न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, हनीट्रॅप खंडणीचा हा प्रकार गेल्या ऑगस्ट २०२३ मध्ये घडला होता. दिल्लीतील नार्कोटिक ब्यूरोचे अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी व्यावसायिकाला संशयितांनी म्हापशातील एका व्हिलामध्ये बोलावून घेतले व नंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ३० लाख रुपये खंडणी उकळली होती.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी भा.दं.स.च्या ३४२, १७०, ३२३, ५०६(२), ३८९ व ३४ कलमांन्वये गुन्हा नोंद करीत मार्च २०२४ पासून वरील संशयितांना अटक केली होती. तर संशयित इमादसह त्याचा एक साथीदार पसार होता. पोलीस तावडीतून पलायन प्रकरणी सहार-मुंबई पोलिसांनीही संशयित इमाद वसीम खानविरुद्ध भा.दं.स.च्या २२४ व ३२३ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
व्हिलामध्ये शिजला फिर्यादीला अडकवण्याचा कट
संशयित इमाद खान हा बीकॉम पदवीधर आहे. सुरुवातीला दिल्लीतील यमुनानगर येथे तो अकाऊंटंट म्हणून काम करत होता. २०२३ साली त्याचा चुलत भाऊ दिल्लीतील एका क्लबमध्ये शेफ होता. त्याने इमादची भेट संशयित निवेदिता शर्माशी घालून दिली. नंतर त्यांची ओळख भुवन अरोरा, मोहम्मद बासित, फैजान खान आणि यासर खान यांच्याशी झाली व ते हनीट्रॅप गुन्ह्यात गुंतले गेले. संशयित निवेदिताने पीडित म्हापसास्थित दिल्लीतील व्यावसायिकाची माहिती मिळवली. नंतर सर्वजण गोव्यात आले. त्यांनी एक व्हिला बुक केला. तिथे फिर्यादीला अडकवण्याचा कट शिजला नंतर हा प्लान प्रत्यक्षात उतरवला गेला.