म्हापसा बाजारात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th March, 11:46 pm
म्हापसा बाजारात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

म्हापसा : येथील बाजारपेठेत एका युवकाने सुरी घेऊन स्वतःचा गळा कापण्याचा प्रकार घडला. या अज्ञात युवकावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पदविक्रेत्यांच्या अडथळ्यामुळे घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचू शकली नसल्याने मार्केटमधील रस्ते अडविण्याचा प्रकार पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी २० ते २५ वयोगटातील युवक मार्केटमधील पॅराडाईस फार्मसी आळीमध्ये आला. येथील सामंत यांच्या दुकानाजवळ रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका पदविक्रेत्याकडील विक्रीस ठेवलेली सुरी उचलली आणि काही क्षणात त्याने ती आपल्या गळ्यावर ओढली. यात रक्तबंबाळ होऊन तो जमिनीवर पडला.

बाजारात यावेळी गर्दी होती. हा प्रकार पाहून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका आणि पोलीस दाखल झाले.

ही घटना बसस्थानकापासून सुमारे १०० मीटरवर घडली होती. मात्र, बाजारातील रस्ता पदविक्रेत्यांनी आपला व्यवसाय थाटून अडविला होता. त्यामुळे घटनास्थळी रुग्णवाहिकेला पोचण्यास अडथळा निर्माण झाला. शेवटी पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचरवरून जखमीला बसस्थानकावर नेले व तिथून त्याला जिल्हा इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी जखमीला लगेच गोमेकॉत पुढील उपचारार्थ हलवले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

म्हापसा मार्केटमधील अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकेला आपत्कालीन परिस्थितीवेळी बाजारात जाण्यास पुन्हा अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

जखमी युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? हे अजून स्पष्ट झालेले नसून म्हापसा पोलीस उपनिरीक्षक बाबलो परब हे पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा