म्हापसास्थित दिल्लीतील एका व्यवसायिकाकडून ३० लाख रूपये खंडणी उकळण्यात होता मोठा हात
पणजी : मुंबई विमानतळावरून म्हापसा पोलिसांच्या तावडीतून इमाद वसीम खान (उत्तरप्रदेश) हा कैदी १९ जून २०२४ रोजी पसार झाला होता. नार्कोटीक कंट्रोल ब्यूरोचे अधिकारी असल्याचे भासवून म्हापसास्थित दिल्लीतील एका व्यवसायिकाकडून ३० लाख रूपये खंडणी उकळल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपीचा समावेश होता. त्याच्या चौघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने पलायन केले होते.
दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, विविध मार्गांनी सखोल तपास करत असताना सदर आरोपीचे कार्यक्षेत्र हे गोव्याबाहेर देखील विस्तारलेले असल्याचे आढळले. दरम्यान म्हापसा पोलिसांनी गोपनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल (गुन्हे) विभागाशी समन्वय साधत आरोपीचे ठिकाण ट्रेस केले. सापळा रचून नंतर इमाद वसीम खान (उत्तरप्रदेश) याला म्हापसा पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एका पथकाच्या सहाय्याने डेहराडूनमधून शनिवारी ताब्यात घेतले.
त्याच्यावर म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये भादंविच्या कलम ३४२, १७०, २३२, ५०६, ३८९ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, मुंबई विमानतळावर ट्रान्झिटमध्ये असताना, गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या झटापटीनंतर तो गोवा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान आरोपी, मुंबईच्या सहर पोलीस स्थानकात भादंविच्या कलम ३२३ आणि २२४ अंतर्गत देखील हवा आहे.
इमाद खान याने बीकॉम केले आहे. तो सुरुवातीला दिल्लीतील यमुना नगर येथे अकाऊंटंट म्हणून काम करत होता. २०२३ साली त्याचा चुलत भाऊ दिल्लीतील एका क्लबमध्ये शेफ म्हणून कामाला लागला होता. चुलत भावाने इमादची भेट निवेदिता शर्माशी घालून दिली. तिने पुढे त्याची भेट भुवन अरोरा, मोहम्मद बासित, फैजान खान आणि यासर खान यांच्याशी घडवून आणली. नंतर निवेदिता शर्मा हीने म्हापसास्थित दिल्लीतील एका व्यवसायिकाबाबत माहिती दिली. सर्वजण गोव्यात आले. त्यांनी एक व्हिला बुक केला. व्यवसायिकाला अडकवण्याचा कट शिजवण्यात आला आणि नंतर हा प्लान प्रत्यक्षात उतरवला. खंडणी प्रकरणी पोलिसांनी याधीच भुवन अरोरा, निवेदिता शर्मा, मोहम्मद बासित, फैजान खान आणि यासर खान यांना अटक केली आहे.