लाच, गुन्हेगारी गैरवर्तन, महसूल बुडवणे आदी प्रकारांचा समावेश
पणजी : दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) १ मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत या काळात ३१ गुन्हे निकालात काढले आहे. त्यातील ९ गुन्ह्यांत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत. तर २२ गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयात अंतिम अहवाल सादर करून तपास बंद केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
या संदर्भात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता. त्यानुसार, कामत यांनी दक्षता खात्याने तसेच भ्रष्टाचार विरोधी पथकाने किती तक्रारी हाताळले. तसेच त्याच्या तपासाची सविस्तर माहिती मागितली. त्यानुसार, वरील कालावधीत दक्षता खात्याकडे २,७४१ तक्रारी नोंद झाल्या आहे. मात्र, त्या तक्रारीची तपशीलवार माहितीची संख्या आणि कागदपत्रे भरपूर असल्यामुळे देणे शक्य नसल्याची माहिती डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिली.
याशिवाय भ्रष्टाचार विरोधी पथकाने वरील कालावधीत ३१ गुन्हे निकालात काढले आहे. त्यातील ९ गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहेत. याशिवाय २२ गुन्ह्यांसंदर्भात न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने अंतिम अहवाल मंजूर केला आहे. यात लाच स्वीकारल्याप्रकरणी रंगेहाथ पकडलेले, सेवा बजावत असताना गुन्हेगारी गैरवर्तन करून सरकारचा महसूल बुडवणे व इतर प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.