पावसापूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे होणार पूर्ण!

सरकारची न्यायालयात हमी : ताड माड देवस्थानजवळ कामाला विलंब

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
03rd April, 12:39 am
पावसापूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे होणार पूर्ण!

पणजी : सांतिनेज येथील ताड माड देवस्थानजवळ गॅस पाईपलाईन आणि सिवेज लाईनमुळे काही प्रमाणात विलंब होणार आहे. मात्र, पावसापूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण होणार आहेत. या प्रकरणी अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सविस्तर माहिती देणारी यादी सादर केली. या संदर्भात बाजू मांडण्यासाठी याचिकादारांनी वेळ मागितल्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी होणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पामुळे व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कामामुळे होणारे धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी न्यायालयात पियुष पांचाल, आॅल्विन डिसा आणि नीलम नावेलकर आणि ख्रिस्तस लोपीस आणि सदानंद वायंगणकर यांनी दोन वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. 

जनहित याचिका दाखल झाल्यावर न्यायाधिशांनी स्मार्ट सिटी अंतर्गत कामांची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यानंतर न्यायालयाने या संदर्भात निर्देश जारी करून कामामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना लागू करण्यास सांगितले होते. तसेच ३१ मे २०२४ पर्यंत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचे निर्देशही दिले होते. दरम्यान, सरकारने वरील मुदतीत ३० जून २०२५ पर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती. तसेच अंतर्गत सर्व रस्ते वाहतुकीसाठी ३१ मार्चपर्यंत सुरू करण्यात येणार आहेत. फुटपाथ तसेच सुशोभिकरण व इतर कामे ३० जूनपर्यंत पूर्ण होणार आहेत, अशी हमी न्यायालयाला दिली होती. या प्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली असता, अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी न्यायालयात सविस्तर माहिती देणारी यादी सादर करून सांतिनेझ येथील ताड माड परिसरात गॅस आणि सिवरेज पाईपलाईन असल्यामुळे तिथे विलंब होणार आहे. त्या परिसरातील काम मे मध्ये पूर्ण होणार आहे. तसेच स्मार्ट सिटी अंतर्गतचे काम पावसापूर्वी होणार असल्याची माहिती दिली. या प्रकरणी याचिकादारांनी वरील यादीला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने याचिकेची पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी ठेवली आहे.

पाईपलाईनमुळे रस्ता कामास उशीर

सांतइनेज ताडमाड येथील सांडपाणी लाइन १२ मीटर खोलीपर्यंत टाकली जात आहे. १२ मीटर खोल खोदकाम करताना पाणी लागत असल्याने कामाला विलंब होतो. सीवरेज लाईन पूर्ण झाल्यानंतर रस्ता करणे शक्य होईल, असे स्मार्ट सिटीचे सीईओ संजीत रॉड्रिग्ज यांनी सांगितले. सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता करणे शक्य होईल. सर्व काम ३१ मे पर्यंत पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा