अनधिकृत बांधकामांविषयीचे ३,९२२ अर्ज फेटाळले

पाच वर्षांत १,६७१ अर्ज मंजूर : एकूण १०,२२१ जणांनी सादर केले अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st April, 12:20 am
अनधिकृत बांधकामांविषयीचे ३,९२२ अर्ज फेटाळले

पणजी : गोवा अनधिकृत बांधकाम नियमन कायदा २०१६ अंतर्गत २०२० पासून आतापर्यंत १,६७१ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तर वरील कालावधीत दाखल केलेल्या १०,२२१ पैकी ३८.३७ टक्के म्हणजे ३,९२२ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत लेखी उत्तरातून दिली आहे.
या संदर्भात सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता. त्यानुसार, गोवा अनधिकृत बांधकाम नियमन कायदा २०१६ अंतर्गत राज्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांकडे किती जणांनी अर्ज दाखल केले. तसेच प्रलंबित आणि मंजूर झालेल्या अर्जाबाबत तपशील माहिती मागितली होती. त्यानुसार, २०२० पासून आतापर्यंत वरील कायद्याअंतर्गत १०,२२१ जणांनी अर्ज सादर केले आहे. त्यातील १,६७१ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर ३,९२२ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे ४,६२८ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती मंत्री मोन्सेरात यांनी दिली.
गोवा अनधिकृत बांधकाम नियमन कायदा २०१६ अंतर्गत दाखल केलेल्या अर्जातील सर्वाधिक ४३५ केपे तालुक्यातील अर्ज मंजूर करण्यात आले आहे. तर सर्वांत कमी १३ अर्ज मुरगाव तालुक्यातील मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय सर्वाधिक अर्ज १,४३४ बार्देश तालुक्यातील तर सर्वांत कमी अर्ज ११८ धारबांदोडा तालुक्यातील दाखल केले आहे, अशी माहिती मंत्री मोन्सेरात यांनी दिली.

हेही वाचा